#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२४/१०/२५)
#गाढमैत्री
माधुरी आणि अलका शाळेत एकाच बेंच वर बसणाऱ्या जिवलग मैत्रिणी. शाळेत दोघींनी एकमेकांच्या घरच्या खाऊ बरोबर बऱ्याच गप्पा शेअर केल्या होत्या. इतकेच काय कधी एखादीने एखाद्या विषयाची वही आणली नसेल तर दुसरी तिला वहीची पाने शिवणीतून निघू नये म्हणून स्वतःच्या वहीतील मधली पाने काढून द्यायची. एकीच्या पेनमधील शाई संपली तर दुसरी तिचे पेन उघडून तिच्या पेनमध्ये शाई भरायची. शारीरिक शिक्षणाच्या तासाला दोघींना एकाच टीम मध्ये रहायचं असायचं. त्यांच्या मैत्रीची चर्चा शाळेत, कॉलेजमध्ये व्हायची.
नंतर माधुरीच्या बाबांच्या बदलीमुळे ती दुसऱ्या शहरात राहायला गेली. तेव्हा आतासारखे फोन, समाजमाध्यमे नव्हती. दोघी एकमेकींना पत्र लिहून आपली मैत्री टिकवून होत्या. लग्नानंतर मुलाबाळांच्या, संसाराच्या व्यापात पत्रव्यवहार कमी होत होत थांबला. एकदा अनेक वर्षांनंतर एक विलक्षण योगायोग दोघींच्या आयुष्यात आला. दोघीही एकाच ट्रेनने एका प्लॅटफॉर्मवर उतरल्या होत्या. दोघीही विरुद्ध दिशेच्या पायरीवरून जिना चढून येत होत्या. वरच्या दोन तीन पायऱ्या चढताना दोघीही एकमेकींकडे पाहत होत्या. दोघींची शारीरिक ठेवण बदलली होती. दोघीही एकमेकींकडे पाहत होत्या. चेहरा थोडाफार बदलला होता. पण डोळे ओळखीची ग्वाही देत होत्या. अगदी जवळ आल्यावर दोघींनी एकाच वेळी एकमेकींची नावे घेतली आणि मिठीच मारली.
दोघींना किती बोलू किती नको असे झाले. अलका म्हणाली,
“मधु कधी वाटलाच नाही गं आपण अशा भेटू. तुझी आठवण तर खूप निघायची. माझ्या मुलींना पण मधु मावशीच्या आवडी निवडी ऐकून ठाऊक आहेत.”
“अगं मला खात्री होती तू कधीतरी भेटशीलच. तुला माहिती आहे का मी कालच पुन्हा तुला पत्र लिहिले आहे. आता आपली मुलं मोठी झाली आपण नक्की भेटूया. आपल्यातलं मैत्रीचं नातं जुनं झालं तरी ते एखाद्या जुन्या पुस्तकाप्रमाणे आहे ज्यातील शब्द कधीच बदलत नाहीत.
©️®️सीमा गंगाधरे
शब्द संख्या २४२
