# माझ्यातली मी #
….. वीक एंड टास्क… (२/१/२०2६)
.,…… पुणेरी पाट्या….. ( विनोदी कथा)
……… गंमत पुणेरी पाट्यांची………
प्रणित आणि प्रणिता हे पुणेकरी. दोघांचाही जन्म पुण्याचाच, शिक्षण हि पुण्यातच आणि लग्न करूनही पुण्यातच सेटल झाले. त्यांना दोन मुले. एक आठ वर्षाचा व दुसरा दहा वर्षाचा. प्रणितची बहिण प्रिया एका छोट्याशा गावात राहत होती. तिलाही एक मुलगी व एक मुलगा. मुले तशी लहानच दहा-बारा वर्षाची.
तेव्हाही व आताही मुलांना सुट्टी मध्ये मामाकडे जायला खूप आवडायचे. तसेच ठरवून साक्षीने व समीरने आठ दिवसाची सुट्टी काढून पुण्याला जायचे ठरविले व त्याप्रमाणे ते आले. आल्या आल्या साक्षीच्या मुलांनी मामा, आपण बाहेर कुठेतरी काहीतरी बघण्यास जाऊया.
मामा म्हणाला,
अरे बाळांनो,तुम्ही आत्ताच तर आलात ना. किती वेळ झाला बरे तुम्हाला येऊन! आपण उद्या जाऊया. दोन दिवस मला व तुमच्या मामीला सुट्टी आहे. आपण काहीतरी प्लान करू. त्याप्रमाणे ते बाहेर फिरायला निघाले.
आपआपल्या फोर व्हीलर घेऊन कंपनी पुणे बघायला निघाली. प्रणित ने मुलांना विचारले बाळांनो, पहिले आपण पर्वती टेकडी बघायची का?
सगळी मुले जोशातच म्हणाली, हो आपण पर्वती टेकडी बघूया. पर्वतीकडे गाड्या वळल्या. पार्किंगला गाड्या लावून ते पर्वतीकडे वळले. तर समोरच मोठ्या अक्षरात पाटी लिहिली होती….
**** पायऱ्या १०३ आहेत. सांभाळून जा.
वृद्ध माणसे सहज चढू शकतील पण
तरुण मंडळींना काठीचा आधार लागेल ****
मामाची मुले ती पाटी वाचून खो-खो हसायला लागली.
काय रे मामा, अशी विरोधाभास असलेली पाटी का लिहिली? आपल्याला का लागेल काठीचा आधार. आपण काय म्हातारे आहोत!
अरे बेटा,
पुणेरी पाटीची हीच खरी गंमत आहे. कधीही सरळ बोलायचे नाही. उलटच बोलायचे,करायचे . अति उत्साहात सगळी मंडळी पायऱ्या चढून तेथील पार्वती मंदिर, देव देवेश्वर मंदिर व पर्वती संग्रहालय बघून शनिवारवाडा बघायला गेली. पेशव्यांच्या इतिहासावर आधारित एक पर्यटन स्थळ आहे ते. तेथील “प्रकाश व ध्वनी ” ( लाईट अँड साऊंड शो )कार्यक्रम हा शो बघायला सगळी जण जातात. ही मंडळी तिकडे जायला निघाली तर समोर सप्तरंगात मोठी पाटी लिहिलेली होती.
**** जी सगळ्यात उशिरा या ठिकाणी पोहोचतील त्यांचा नंबर पहिल्या
रांगेत लागेल ****
परत मुलांचे हास्याचे कारंजे. सगळी मुले पोट धरून हसू लागली. पाटीची ही विनोदी आगळीवेगळी खासियत बघून हसायला तर यायचे पण विरुद्ध अर्थ निघणाऱ्या या पाट्यांविषयी नवलही तेवढेच वाटायचे.
काय रे मामा, असं कसं तुमचं पुणे. कोणत्याही ठिकाणी जा सगळीकडे सुरुवात करायच्या आधी या विरोधासात्मक पाट्याच वाचाव्या लागतात. आमच्या जवळ खूप मोठा हास्याचा खजिनाच जमणार. हो ना!
हो रे बाळांनो, मज्जा आहे आमच्या पुण्यात.
आता एक वाजला होता. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून एका रेस्टॉरंट मध्ये गेलो तर समोर पाटी……
**** ताटात अन्न न टाकल्यास बिलावर ३०% सवलत मिळेल.****
बापरे मामा, म्हणजे ताटातलं अन्नपूर्ण खावच लागेल.
मामा, भारी आहे बाबा तुमचं पुणं!
पुण्यामध्ये मिसळपाव ही प्रसिद्धच आहे. समोरच एक रेस्टॉरंट होतं. त्यावरील मिसळपाव या डिश चा फोटो बघून मुले म्हणाली, आपण मिसळपाव खाऊ या.
अरे वा! तुम्हाला येथील मिसळपाव खायची तर जाऊया. मंडळी त्या रेस्टॉरंट मध्ये गेली तर समोरच भली मोठी पार्टी……
**** येथील मिसळपाव खा.
तोंडातून ब्र काढायचं नाही.
तिखट फिक्याचा दोष मिरचीला द्यावा
आम्हाला नाही.****
तेथील मिसळपाव खाऊन सगळ्यांच्या नाकातून पाणी टपकायला लागले. खाताना मज्जा पण तितकीच आली.
सरते शेवटी बायका मुलांचं आवडतं मार्केटिंग….
प्रणितच्या बहिणीने प्रियाने प्रणितला म्हटले,
दादा आपण तुळशीबागेत जाऊया.
तो म्हणाला, नक्कीच जाऊ. पुण्यात आल्यावर तुळशीबागेत खरेदी न करता गावाला जाणे म्हणजे… हे तर कदापिही शक्य नाही. मग सगळी वरात तुळशीबागेकडे निघाली. गाडी पार्किंगला कुठेच जागा दिसेना. जिथे मुंगीला जायला जागा नाही तिथे एवढ्या मोठ्या गाड्या कुठे ठेवणार. जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर गाडी पार्क करावी लागली. तेथून सगळी मंडळी तुळशीबागेकडे पायी चालत निघाली. आधीच इतकं सगळं बघून थकून गेलेली ही मंडळी कशीतरी पावले उचलत तुळशीबागेत पोहोचली. तेथील दृश्य बघून ती अवाकच झाली. कपडे,दागिने, घरगुती वस्तू,सजावटीचे सामान सौंदर्यप्रसाधने आणि पूजा साहित्य यांची दुकाने व तिथे खरेदी करण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकांची गर्दी बघून त्यांना नवलच वाटले. कारण प्रियाची मुले तर तुळशी बागेत पहिल्यांदाच आली होती.
हळूहळू गर्दीतून रस्ता शोधत प्रथम सौंदर्यप्रसाधनाच्या दुकानात प्रियाने आपली पावले वळवली. समोर जाताच एक भली मोठी पाटी वाचायला मिळाली…..
**** सौंदर्य प्रसाधने खरेदी करा पण
गोरे असाल तर कावळ्याप्रमाणे काळे कुळकुळीत व्हाल.****
प्रियाची मुलगी म्हणाली,
काय रे मामा, काय ग मामी, असं का लिहितात ते. कोणी घेऊ नये म्हणून का.
प्रणिता म्हणाली,
नाही ग बाळा,
पुणेरी पाट्यांची हीच खरी खास गंमत आहे. अशा पाट्या वाचायला बाहेर गावावरून लोक येतात. समोर जाता जाता अजून एक मोठी पाटी दिसली….
**** पाकीट पर्स मध्ये ठेवा
पण पर्स उघडीच ठेवा
म्हणजे पैसे चोरीला जाणार नाहीत.****
मुलांना तर पुणेरी पाट्या वाचून हास्याचा जणू खजिनाच मिळाला.
व्वा! जबरदस्त आहे मामा तुमचं पुणं. आता एक दोन वर्षा आड तरी आम्ही पुण्यात येत जाऊ व नवीन नवीन पुणेरी पाट्या वाचायचा आनंद लुटू. हास्याचे फवारे उडवून दिवसभराचा वेळ सत्कारणी लावून मंडळी रात्री घरी आली व मुलेही पुणेरी पाट्यांची स्वप्न बघत झोपी गेली….
……. अंजली आमलेकर…….
