#माझ्यातली मी#म्युझिक..भाग एक ©®सीए संगीता मेहता
कौशिकी गायन करत नाही.. तिचं गायन उस्फूर्त होत रहातं.
सूर लावणं हे संघर्षमय असू शकतं. सूर सहज लागणं स्वर्गीय असतं.
आणि म्हणून तो effortless सहजसुंदर आविष्कार.
ॲडमिन संगीता देवकर यांनी टास्क देताना एक मुद्दा दिला..जो मला फार आवडला..आवडत्या गायकाचा संगीतकाराचा तुमच्या वर झालेला परिणाम…आपण बरीच उदाहरणे वर्तमानपत्रात वाचतो वा सोशल मीडियावर पाहतो..आवडत्या सेलिब्रिटीजना अनुसरणाऱे फॅन्स व त्यांचे किस्से. आणि खरंच आपल्यावरही परिणाम होत असतो..
आणि या अनुषंगाने मला एक मुद्दा अधोरेखित करावा वाटतो तो हा की राजकारण, कला, क्रीडा, चित्रपट, साहित्य कोणतेही क्षेत्र असो..ज्या सेलिब्रिटीजना लाखोंच्या संख्येने लोक फाॅलो करतात त्यांनी सार्वजनिक आयुष्यात देहबोली संयमित ठेवावी, प्रतिसाद संयत असावेत..जाहिराती निवडताना जुगार, दारू, गुटखा किंवा इतरही फक्त पैसा मिळतो म्हणून करू नयेत..
युवा पिढी बरेचदा एक आयडाॅल समजत त्याच वाईट सवयी स्टाईल्स आपल्याशा करते.
माझ्यावर गीत रामायणाचा प्रभाव खूप पडला..बाबूजींच्या चाली आणि बबनराव नावडीकरांचा गळा.. अशी ती गाणी मी शंभरपेक्षा अधिक वेळा म्हणजे दिवसातून दोन दोनदा सतत सहा वर्षे पेठांमधल्या देवळांमध्ये ऐकत होते.. अध्यात्माची तर गोडी लागलीच..राम हे आराध्य दैवत झाले..आपोआप रामनाम सतत अंतरात श्वासागणिक आताही चालू राहतं.जीवनाला एक अधिष्ठान मिळाले.संस्कार चांगले झाले आणि आश्चर्य म्हणजे बबनराव नावडीकर यांच्यावरही इतका परिणाम झाला की त्यांनीही त्या धर्तीवर समर्थ रामदास स्वामींवर गीत दासायन रचले.. त्याही गाण्यांना त्यांनी सुंदर चाली लावल्या होत्या.
हे बालवयात आणि ……
परिपक्व वयात… मी ती गझल ऐकली..कौशिकी चक्रबोर्तीची..
…वो जो हममें तुममें करार था… तुम्हें याद हो के ना याद हो… सुंदर आविष्कार होता..पण मला सारखं वाटत होतं ..
त्या तबलजीची एवढी कलाबाजी त्या गझलगायनाला मारक ठरत होती.. हार्मोनियम हवं होते असंही वाटलं…मधे थोडी साथीला असती तर रंगत वाढली असती.
पण ते दैवी सूर काळजात रुतून बसले ते कायमचे..
असं वाटत होतं.. ती कुठली तरी कथा सांगत होती आणि बासरी वादक मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरात ती फुलवत नेत होता
तिच्या शास्त्रीय संगीताची ही मैफल ठरली मेजवानीच..म्हणजे पर्वणीच..
बकेट लिस्ट मधली एक इच्छा पुरी झाली तर परत ऐकायच्या इच्छेची फिरून भरही पडली
अस्सल उत्कृष्ट उच्च श्रेणी..विलक्षण भावपूर्ण.. साक्षात्कारच..
बेगम अख्तर जिवंत हवी होती.. हे ऐकायला.
आसक्त झाले मी. . पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं.. नशा पुन्हा पुन्हा हवी असं…वाटत राहिलं.
मधुराणीच्या स्वरात याच गझलेनं आधी न्हाहू घातलेलं.. प्रभाव असेल तर नवं रूचणं कठीण..जबरदस्त आदर तिच्या विषयी होता..पण धक्का लागला नाही..त्या आठवणींना…कौशिकीच्या उस्फूर्त गायकीने परत भिजवून टाकलं..
Commanding brilliant Voice खरंच…
मैफल आणि मेंदू दोन्हीची पकड घेणारा.
मिया की तोडीत गंभीर आवाहन…प्रियाला पुकारणे..
यातले कोमल व तीव्र स्वर म्हणजे भावनेचा सागर उसळतो.
कोमल गंधार, कोमल रिषभाकडे झुकणारा अर्थात अति कोमल गंधार..तिन्ही सप्तकात तिनं फुलवला.
पकड़
ध़॒ऩिसारे॒ग॒रे॒ग॒रे॒सा
आरोह अवरोह
सारे॒ग॒म॓पध॒निसां – सांनिध॒पम॓ग॒रे॒सा
वादी स्वर
ध़॒
संवादी स्वर
ग॒
करूण रस.
सगळा जीव कानात साठून राहिला.. असं वाटलं आपल्याला फक्त कान…हा एकच अवयव आहे.
तिचं एक भजन तर माझं खूप लाडकं. हरकती खूप असतील तर मूळ भावाला बाधा येते असं म्हणतात.. पण हे तिचं गायन भगवंताला आळवत आपलीही गानसमाधी लावून टाकतं..असं वाटतं की खरंच देव भेटतोय….
आपणही जरूर ऐका ते भजन…भैरवी बरं का…
सौमिक दत्ताचे सरोदवादन,घाटेचे तबलावादन,परोमिता मुखर्जीचं अफलातून हार्मोनियम वाजवणं…..
आणि सारंगीवर हात अल्लारखाँ यामिनखानचा…
तुम आ जाना भगवान
मैं द्वार खोलकर बैठा हूॅं…
तेरे बिना मनमंदिर मेरा है पडा सुनसान…
रीत पूजा की याद नही क्या चढाऊ परसाद नही
तुम हो दाता मैं हूॅं भिखारी क्या दू मैं बलिदान
धनकी तो मुझे प्यास नही है
दर्श मिले बस आस यही है
तनिक भगतके भगतनादकी हो जाए पहचान
अक्षरशः डोळ्यातून धारा वहात होत्या माझ्या.
इतरांचीही तीच अवस्था होती.
स्वरसम्राज्ञी खरंच निःशब्द करणारी…healing by feeling करणारा आवाजाचा दुर्मिळ पोत.
गायकीतला कोणताही प्रकार सहजसुंदर हाताळते..तोड नाही.
Perfection accuracy म्हणाल तर भारतीय कला संस्कृतीची खऱ्या अर्थाने अभूतपूर्व ब्रॅण्ड ॲम्बेसेडर….नवीन मानक मापदंड बेंचमार्क या क्षेत्रात.. दहापैकी गुण अकरा.
पूर्णतेची भावना.. खरं तर इथं मापदंडही फिके..अपुरे.
सगळं मिळाले अशी तृप्तीची भावना येते.
यापेक्षा अजून जादा काय हवं.. सगळ्या चिंता विसरायला होतं. चाहते.. हरकतीच्या अद्भुत अद्वितीय अदा पाहून…मन भरून गेलं अशा भावनेने चाहते रसिक घरी पोचतात.
माणूस म्हणून रूप रस गंध स्वर सर्व आस्वाद कसा घेता यावा.. तर बुद्धीवादाच्या निकषांवर खरा तर उतरावाच पण भावनेचाही पूर्णपणे रसपरिपोष व्हावा.. ही मनुष्य योनी धन्य म्हणायची. नसांतून सुरांची नदी वाहते आहे असं वाटत राहतं..असा अभ्यास म्हणजे खरं तर तपश्चर्याच म्हणायला हवी.
बदरिया कारी घटा घिर आयी मेरे मन में सोच सोच जिया आसु लाए याद पिया की आयी..कैसे मिलन हो मनमोहन हे …जेव्हा ती कोणत्याही वाद्याच्या साथसंगती शिवाय ( मा एवं सा वादी मध्यम व संवादी षड्ज कोमल तर सर्व ताना नोट्स यात.. धैवत गंधार निषाद शुद्ध व कोमल दोन्ही)हे मीराबाई के मल्हार मधे गाते तेव्हा तर माझ्या जिवाची सतार होते आणि अक्षरश: आपण आपल्या मनमोहनाचे होऊन जातो.
पाऊस पडेल खरंच असं वाटत असताना मी मात्र वाहून गेलेली असते. असं वाटतं … राग गायचे नसतात… स्वर भिनवायचे असतात..आपण रागच होऊन जायचं.. गातानाही ऐकतानाही.
Silence before music and after music हीच सफलता.
तिचा तराणा अंतरा ती नजाकत आणि समेवर येणं म्हणजे रम्य नजाराच.
कजरी ..ठुमरी तर कयामतच…मोहे छेडो ना तुम हो नंद के चेले बडी देर हुई घर जाने दे.. पकडो ना कर ब्रिज नारी देखे सारी सारी नणंद सुनेगी देगी गाली तुम मानोना वृंदा कहत जिया राखो ना ….भावपूर्ण
सहज सुंदर आविष्कार.. प्रभुत्व सुरांवरचं.. सादरीकरण..
परमेश्वराची मी खरंच कृतज्ञ आहे.. आत्मा ओतलेला असतो
स्वरांमधे…तिचं सरगमचं वेड… तिचं मेलडी डी कोडिंग करणं पलटा पॅटर्न्स म्हणजे तर ऊर्जादायी अनुभूती.
पोटातून हा sss पासून आ ssss या “‘आ'”काराचे प्रोजेक्शन फार सुंदर रीत्या ती समजावून सांगते. मू्र्त स्वरूपात ती स्वर पहात असते… अमूर्तातून मूर्त आणि परत साकारातून पूर्ण निराकाराकडे हा प्रवास कलाकार म्हणून आणि आस्वादक रसिक म्हणून बरोबरच करायचा तर कौशिकीचीच जादू हवी.
कधी अस्वस्थ वाटलं की आश्वस्त करणारा हा गळा. विश्वाच्या
गाभ्याशी अंतर्शक्तीशी आपण जोडून राहिलो आहोत अशी जाणीव होते.
शुद्ध.. उदात्त . . खरा आनंद…
लोलक किंवा झोपाळा.. त्या शैलीत हे अनुनाद..Vibrations.
बाह्य शक्तीची वारंवारता शरीराच्या नैसर्गिक वारंवारतेशी मेळ खाते तेव्हा आपोआप वाढीव कंपने होऊ लागतात..
गायिका.. श्रोता.. दुसरं कुठलं भाष्य मध्ये गरजेचं रहात नाही.
काव्यातला भावार्थ पूर्णपणे पोचतो.. डोळ्यातून अत्यानंदाने
पाणी वाहू लागतं..
अष्टभाव जागृत झाले.. परमेश्वराचं दर्शन झाले आणि जर विचारले.. सांग.. काय वरदान हवे.. उत्तर असतं..पूर्णानंदाची अनुभूती..ती अनुभूतीच देतात हे निर्दोष परिपूर्ण स्वर.
साक्षात सरस्वती दर्शन…जिवाची कुरवंडी नादब्रह्मावरून ओवाळून टाकावी खरंच.
काहीच वरदान नाही मागू शकणार.. नुसत्या दर्शनाने उन्मनी अवस्था असेल.. काही मागायचे भान रहाणार नाही.. कारण सगळं पूर्ण झाल्याची भावना तनमनचित्ताला व्यापून राहील.
अशी लाडकी माझी गायिका.. देवानं अशा या गायिकेला निरामय आरोग्य न् भरपूर आयुष्य प्रदान करो.
परिणाम या गायनाचा अजून एक असा झाला की सी ए व्यवसायामुळे माझ्या शास्त्रीय नृत्याच्या कथ्थकाच्या उपासनेत पडलेल्या कायमच्या खंडाचे दुःख म्हणजे तीव्रता थोडी कमी झाली.. आणि मी गायनाचा क्लास भरत नाट्य मंदिरात लावला.. प्रारंभिक प्रथमा या पुढे काय गाडी गेली नाही.. घर संसारही करताना ते काय जमेना..
कविता करणे तर बंद पडत चाललेच होते.तरीही नंतर माणूस म्हणून जगणं मला माझ्यातल्या कलावंताला सोपं गेलं..
मी तिला ऐकत राहिले… ऐकतच राहिले.
कौशिकीच्या गाण्याचा एक अप्रत्यक्ष परिणाम असाही झाला की साहित्य असो कला असो भाषेचं बंधन नाही असा एक संस्कार माझ्यावर झाला.
कारण तिचं संगीत ऐकताना आत्म्यापर्यंत पोचायचे..आणि मग मला कुठल्याही भाषेचं वावडं राहिलं नाही. मी गुजराती, हिंदी, बंगाली पंजाबी मराठी ऐकत होतेच.. पण नंतर कन्नड, तेलगू, तमिळ ही ऐकू लागले.. सब टायटलसह असेल तर भावार्थ वाचत म्युझिकचा आस्वाद घेऊ लागले..
या परिवर्तनाचं टोक म्हणजे मी आसामी, कन्नड, तामिळ तेलगू एवढंच काय पण चिनी,कोरियन, तुर्की सगळ्याच भाषांमधल्या सिनेमांचा, वेबसिरीजचा आनंद घेऊ शकले. इंग्रजी, मराठी, हिंदी बेस चांगला.. त्यामुळे हे शक्य झाले. खरं तर या अनुषंगाने अजून एक सांगावं वाटतं की मातृभाषा चांगली असेल तर जगातील कुठल्याही भाषा तुम्ही समजून घेऊ शकता.
अप्रत्यक्ष परिणाम अजून एक असा झाला की तौलनिक अभ्यासाची सवय लागली आणि समीक्षकाला आवश्यक असा एक पिंड विकसित झाला.
तिचं संगीत असो, बोलणं असो, खाजगी जीवन असो… शास्त्रीय अभ्यासपूर्ण तंत्राची शिस्त पावलोपावली जाणवते..
ती नियमितता, शिस्त,मुळाशी जाण्याची स्वभावाची खोली, पर्फेक्शनची आसक्ती हे मलाही भावलं..अकाउंट असो, प्रोजेक्ट असो, घरकाम असो, ज्योतिष शास्त्र असो, साहित्य असो…परफेक्शनचा प्रयत्न हवाच. वरवरचे फक्त न करता मुळाशी जायचंच.आयुष्यात हे खूप उपयोगी पडलं.
ती उंची पुरी आहे सुंदरही आहे… त्यामुळे हा सरंजाम सगळा शाही थाटाचा होऊन जातो. तिची तिच्या संगीताची दोन्हीची
छाप पडते..शिकवतानाही सहज सोपे करून शिकवते.. पलटा व पॅटर्न यावर तर तिचं फार सुंदर लेक्चर आहे.
व्यक्तिमत्त्व असो की विषय….त्याची खोली आणि व्याप्ती चांगली हवी… मग उंची गाठायला वेळ लागत नाही.
कला ही जीवनासाठी खरंच आवश्यक. तुमचा जगण्याचा, विषय किंवा व्यक्तीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलून टाकते.
आत्मा विशुद्ध असेल तरच कलेशी,कलेच्या आस्वादाशी, छंदाशी नातं टिकवू शकतो.
आणि मग दैवी शक्तीशीही नातं जोडायला एक अधिष्ठान पाया तयार होतो..
जेव्हा काहीही अगदी आतपर्यंत पोचतं तेव्हा ती एक दैवी अनुभूती असते.. ईश्वरचरणी लीन करते… हा साक्षात्कार काही दिव्य भव्य वाट्याला येणं यात मनुष्यजन्माची धन्यता.
असे काही आपल्या पर्यंत पोचवणारे हे कलाकार म्हणजे देवदूत प्रेषितच जणू.
हा खरंच शब्दांचा खेळ नाही… रूप रस गंध स्पर्श सर्वच पातळीवर सौंदर्याचा आस्वाद देणारे आणि तेही बुद्धीच्या निकषांवर खरे उतरणारे जे काही आहे ते वाट्याला येणं आणि त्याचा आनंद घेता येणं म्हणजे मानवी जीवनाची सार्थकता. असे आविष्कार म्हणजे मन कृतज्ञभावाने भरून जातेच.
ज्या जुन्या पिढ्यांनी हे संगीत.. शास्त्र.. तंत्र घडवले.. आत्मा ओतून अभ्यास करत पुढे वसा देणं चालू ठेवले… त्यांच्या प्रती ही कृतज्ञभाव हवाच.
चित्रातल्या रंगांमधनं असो, संगीतातल्या स्वरांमधनं असो, नृत्याच्या अंगविक्षेपातून असो,नाट्याच्या अभिनयातून असो, अन्नपूर्णेच्या व्यंजनांमधून असो,साहित्यिकाच्या लेखणीतून असो..रचना प्रामाणिक, विशुद्ध हवी… तर ती भावतेच… तादात्म्यता असतेच.. चाहत्यांकडून वाहवा दाद मिळवतेच.. होय ना?
टीप..
१.
कोणत्याही क्षेत्रातले कलाकार,रचनाकार खूप महत्त्वाचं असं समाजाचं अंग…कारण रचनाकार,कलाकार अभिरुची घडवत असतो.. संवेदनशील घटकांची.
२.
उपासना करताना गुरू पंडितजी हे कौशिकीसाठी वडील नव्हते…जणू कडक हिटलर होते.
ती कदरदारांचा आदर करते.. कदर करते.तिच्यासाठी रसिक श्रोते हे सर्व तंत्रांच्या पलीकडच्या आनंदाच्या प्रवासात मैफलीत सहप्रवासी असतात.
एकदा ती अजय जोगळेकरांसमोर मंचावर रडली होती. तिला ध्यानाच्या पलीकडचा साक्षात्कार झाला..ती बोलली.. माझ्यातली मी हे करू शकली.. कारण ती प्रवाही झाली. आणि मग नंतर मात्र करणारी मी राहिले नाही.. आपोआप होत गेलं.. हाच तर असतो साक्षात्कार.

