©® सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
कुंकू घ्या कुंकू भाग एक
तिच्या माहेरी गरीबी .. पण दिसायला नक्षत्रासारखी सुंदर …
त्यानं तिला हौसेने करून आणलेली.. मोठी जाऊ खूषच झाली.. कामात मदतीचा हात मिळाला म्हणून..
लग्न ठरलं आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा राहिली.. मन रंजीस झालं.. लग्नानंतर नणंद पुस्तक घेऊन आली.. बारावी गणिताचं .. हिनं सोडवून दिलं तशी जाम खूष.. चांगलीच गट्टी जमली दोघींची.
तशी सासू बोलली.. तू सासुरवाशीण.. डोकं पुस्तकात नको घालून बसू..
सगळं काही होतं.. पण काहीतरी कमी होतं.. कुलदेवतेची
खणा नारळानं ओटी भरली.. तेव्हा देवीचा भरलेला मळवट.. मुखड्यावरचं तेज.. खालचा वाघ ..
तो आत्मविश्वास फक्त देवीकडे.. बाईकडे असू शकत नाही?? माझ्या वाट्याला कधी येईल असा आदर सन्मान??
स्त्रीला देव्हाऱ्यात पुजायचं नाही तर पायाची वहाण असल्यासारखं पायीच ठेवायचं… तिची केरसुणी करून टाकायची.. केरसुणीची तरी पूजा होते लक्ष्मीपूजनाला…
पित्त खवळून उठायचं…
ही घुसमट होत होती… कुणी म्हणे अर्धशिशी तर कुणी
म्हणे ॲसिडिटी… तर वैदूबाबा सांगून गेले… कोंडलेली सर्दी…
डोकं जाम चढायचे… सूर्य खाली उतरेपर्यंत…
कुणी टाकून बोललं तरी दुरुत्तर करायला त्राणच नसायचं जिवात… आलं गेलं फतमाईवर.. करता करता सगळ्यांचा राग वैताग नैराश्य काढायचं सामानच झाली ती जणू..
आणि मग कधी थोडं बरं वाटलं की ती मनाशी म्हणायची..
पहिल्याच अपमानाला उलटून बोलायला हवं होतं..
पण वळण पडून गेलं होतं..तिला घराला घरातल्यांनाही.
तूच केलं असशील… तुझ्या मुळेच झालं… तुझ्या कडून हीच अपेक्षा…नाव गंगा पण राहिली होती तहानलेली.. प्रेमाच्या गोडीच्या शब्दावाचून…
आज घट बसले… तयारी तिनंच बरीचशी केलेली..
गोंधळालाही गोंधळी आले.. जोगवा सुरू झाला… एकच शिरशिरी दौडत गेली जणू मेंदूतून माकडहाडातून… तसंही अपमानाचे घाव पडून मेंदू हलका क्षीण झाला होता…
तिचं डोकं चढलेलंच होतं.. आता भुवयाही चढल्या… खांदे धनुष्यासारखे ताणले गेले… एकात एक दोन्ही हातांचे तळवे गुंफले गेले.. शरीरात वाद्यांचा ठेका नसानसात खेळू लागला… देवीचं अलौकिक प्राणतत्व तिनं जणू श्वासात भरून घेतलं… डोळे ताणले गेले… दुसऱ्याच क्षणी पापण्या जड झाल्या…मिटल्या आणि ती पारव्यासारखी घुमू लागली…
हातातून कुंकू पडत होतं…अस्पष्ट भाषेत हुंकार देत ती बोलत होती… कुंकू द्या कुंकू…
सासू चक्रावून गेली.. जाऊबाईही बोलली.. माहेरचे तर असं होतं म्हणून कधी बोलले नाहीत..गंगाच्या अंगात कसं काय यायला लागलं??
पण इतर शेजारपाजारच्या बायका झटका बसावा तशा उठल्या होत्या .. शेजारीच नणंद होती… थोडं लांब थांबा म्हणाली.. हळूहळू आवर्तनांची लय कमी होत गेली..
श्वास फुंकण्यातला जोर कमी कमी होत गेला… मिटलेल्या पापण्या थोड्या थोड्या उघडायला लागल्या.. उंचावल्या परत भिवया ..घामाच्या धारा…आणि पुढ्यात बऱ्यापैकी कुंकवाचे रिंगण… थांबत आलेलं देवीचं वारं…
बायका ते दैवी कुंकू कपाळाला लावत पाया पडत होत्या..
कुणी नड सांगत सोडवणूक कर म्हणत खणा नारळानं ओटी भरेन म्हणत तिच्यातल्या घुमलेल्या देवीपुढं लोटांगण घालत होत्या.. तर कुणी लेकराला पायावर घालत होत्या…कुणी फुलं वहात होतं..
देवीतली अस्मिता जिवंत झाली होती…
इथनं पुढं ती जागीच राहणार होती…
देवी पुन्हा पुन्हा भेटीला येणार होती…
कुंकवानं मनसोक्त मळवट ब्रह्मस्थानी भरून घेणार होती.
संगीता मेहता
कुंकू द्या कुंकू कुंकू घ्या कुंकू भाग दोन
पोरगं यायचं ते तडक काकीच्याच मिठीत…काय कवटाळ्या बायका असतात एकेक… सासू ही गृहीत धरून चाललेली.. मोठी हुषार.. धाकटी साधीच…
अरे नीरज..मी तुझी आई..माझ्याशी बोलत जा ना बाळा..
तुला काहीच कळत नाही..मोठी आईच करेल बरोबर..
गंगा तिच्याच रक्ताच्या नीरज साठी तहानलेली होती.
गावातले म्हणायचे..घाण्याचा बैल सागर..तिचा नवरा.. कुंकवाचा धनी..
जन्मा आला हेला पाणी वाहता मेला – कोणतेही कर्तृत्व न दाखवता जगतोय..भावाच्या हाताखाली..
सगळ्यांनी सगळं स्वीकारलं होतं..घरात घरघर फक्त जात्याची..पण चर्चा गावभर होती..जळत्या मनाला घराचा पोळता वासा भाजत होता..पोकळ होता वासा.. आणि पोकळ वाशांचा आवाज मोठा.
तसंही जग पडत्याची बाजू घेणारं असतं… निदान गावाकडं..
गुलाबाच्या झाडाला वडाचा पार, आन वासराच्या पाठीवर नांगराचा भार.. कोवळी पोर..पण ओज राखली नाही गेली..नक्षत्रासारखी.. पण गरीबाची लेक… नाक डोळे काढले पार.. रोडावलीच…जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
पाषाणाला पुरणपोळी,माणसाला शिळीपोळी(शिवीगाळी)
घरच्या गृहलक्ष्मीला कुणी प्रेमाने म्हणत नव्हतं… जेवलीस का.. वाईच पड.. थकली असशील… मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
रोज मरे त्याला कोण रडे..वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ.
सपिकेचा शेंदूर..छोटीशी देवीची मूर्ती थाळीत ठेवायची तिला पिंजर / कुंकू , हळद लावून ठेवायचं , थोडी पुढ्यात नाणी ठेवायची असे बनावटी वातावरण तयार करायचं….अशा बाबांकडे का कधी गुरवाकडं कैफियत मांडली नाही तिनं.. चार बुक शिकलेली होती ती.
माहेरी गेली… नणंदही बरोबर… तिथं मात्र अंगात देवी आली नाही.. मंगळवारी…
बोलली ती नणंदेला…पाळी आली..म्हणून देवी नसेल आली अंगात.. पावित्र्य राखलं गेलं…
नणंदेला हे पटलं नाही.. तिला घेऊन दवाखान्यात गेली..
निकित कासार मानसोपचार तज्ञ… बोलले…
कौटुंबिक समस्या असतील तर लोकांमध्ये मिसळत नसतील तर एकलकोंड्या व्यक्तींमध्ये अंगात येण्याचे प्रमाण अधिक जाणवते.इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांची बुद्धी या मार्गाने जाते.पझेशन सिंड्रोममध्ये गुरफटलेल्या व्यक्ती त्यांच्या मनातील खळबळ कोणाकडे व्यक्त करत नाहीत.कोंडमारा सहन करण्याची त्यांची इच्छा संपली की त्यांच्या अबोध मनाची अवस्था या क्रियेचा (अंगात येणे) शस्त्र म्हणून वापर करते.
पझेशन सिंड्रोम असलेली व्यक्ती अधूनमधून एखाद्या वेगळ्याच चरित्रासोबत जोडली जाते.तशा चरित्रासंबंधित वागत आपल्या इच्छा व्यक्त करते.परत पूर्ववत होते , पण मधल्या काळातील वर्तन व स्थितीबद्दल ती अनभिज्ञ असते.अनेकदा अंगात आलेल्या व्यक्तींची ओटी भरली किंवा प्रसाद देत कपाळी कुंकू लावल्यास त्या नॉर्मल होतात.
हा सर्व प्रकार त्यांच्या मानसिक भ्रमामुळे घडतो.
नेहमी त्याच त्या गोष्टींचा विचार केल्याने मेंदूतील रसायनांचा समतोल बिघडतो. अशा वेळी स्वतःच्या मनातल्या दुःखाचा निचरा बाईला करायचा असतो. अबोध मनाच्या पातळीवर हा निचरा करण्यासाठी ती काहीकाळ एका दुसऱ्या भूमिकेत प्रवेश करते. कधी कधी देवी अंगात येण्याचा वापर आपलं घरातलं वा समाजातलं स्थान वाढवण्यासाठीही केला जातो
आपल्या देशात बाईला जन्माला येण्यापासून ते पुढे जन्मभर किंमत नसणं हा प्रकार सोसावा लागतो.त्याला उत्तर शोधण्याची तिची धडपड बहुधा अयशस्वी दयेस पात्र ठरते. एका सौभाग्यवतीला कुंकवाची किंमत अशी मोजावी लागते.. ब्रह्मस्थान निद्रिस्त करून.
परत सासरी आली.. यावेळी नणंदेनं काय केलं..वहिनीला बोलली..यावेळी या तारखेला देवीचा जागर.. गोंधळाला बोलवलंय..पाळी पुढे ढकलायला गोळी घे.याही वेळी तेच झालं.
धूपाच्या उग्र दर्पामुळे,आरतीच्या आवाजाने वा सततच्या घंटानादाने भारावलेले जे वातावरण निर्माण झालेले, त्या वातावरणात अंगात येण्याची सूचना सहज स्वीकारली आणि अंगात वारं खेळू लागलं.पाच दहा मिनिटे शारीरिक हालचाली बदलल्या..श्वास जोरात..प्रचंड ऊर्जा घुमण्यात..यावेळी तर घुमत राहिली..ओरडली…बोलली ते वेगळ्याच आवाजात… आणि शेवटी हपापत शांत, निपचित, लोळागोळा गादीवर लोड तक्क्याला टेकून..तरीही कान डोळे टवकारलेले.. पाया पडून घेताना..
कालची संध्याकाळ नणंदेला आठवली..
शाळेतनं आल्यावर निकाल नीरजनं सरळ काकीला दाखवला होता.भावनिक कोंडमारा झालेला.ती देवाला दिवा लावताना एकटीच रडत होती.तिचा लेक तिचा असूनही तिचा नव्हता.तिचा कुंकवाचा धनी तर शेतातनं गेले तीन महिने घरी आला नव्हता.डबा शेतावर पोचत होता..नित्यनेमाने…
घरातील परिस्थितीमुळे मनातील राग, लोभ, क्रोध या भावना कुठेही व्यक्त करता येत नव्हत्या.गंगावहिनी प्रचंड अस्वस्थ होती. अंगात आल्यावर होणा-या शारीरिक आणि मानसिक अतिरेकामुळे या भावनांचा निचरा होत होता..अंगात येणं ही आता गंगावहिनीची एक प्रकारे गरजच झालेली होती. या अंगात येण्याला महत्त्व दिले जात होते. मान मिळत होता; या प्रकारातून तिला बाहेर काढायला हवं होतं. त्यासाठी घरातल्यांचे सहकार्य मात्र मोठ्या प्रमाणावर हवं होतं. तसेच काही औषधे नैराश्य, भ्रम कमी करायला आवश्यक होती. दरम्यान, अशा वागणुकीला खतपाणी घालणे बंद झाले, तिला योग्य सन्मान मिळाला वा मनमोकळेपणे बोलता येऊ लागले तर हे प्रकार बंद होण्याची खूप शक्यता होती.
तिनं लक्ष ठेवायला सुरुवात केली..यावेळी नणंदेनं काय केलं.. कॅलेंडर जुन्या वर्षाचं लावलं..आणि खोटं बोलली…आज देवीची तिथी…
कॅसेटवर आरती जोगवा.देवघरात सारं काही..
वातावरणनिर्मिती केली.आजही सगळी तशीच पुनरावृत्ती.
पण कुंकू काय पडलं नाही..आज तयारी नव्हती वाटतं..
देवीचं नाव अन् स्वतःचं गावं.
बावळी मुद्रा देवळी निद्रा – अत्यंत व्यवहारचतुर निघाली होती वहिनी..हे तिचं ढोंग होतं..नणंद समजून चुकली..
वहिनी ही समजून चुकली..आपलं बिंग फुटलंय..पण तशी एकमेकींना ओळख दिली नाही..कुणीच…
आता सासू वारलीये.दीर वारला आहे..मुलाच्या शिक्षणासाठी जाऊबाई तालुक्याला.नणंद सासरी.पाळी येणं बंद झालं गंगाचे..अंगात येणंही बंद झालं गंगाच्या…
आली नणंद की पाहते..चुन्याच्या पुड्या आहेत का..
नसणारच म्हणा..आता कुंकू पाडावं लागत नाही हातातनं..
आता जोगवा आरती चालू झालं की गंगाच्या अंगात शिरशिरी येतेच..पण कृतज्ञतेची..त्या अंगात येण्याने आणण्याने देवीने मार्गी लावले..कुंकवाचे सौख्य टिकून राहिले..
©®सीएसंगीता मेहता पुणे मधुमक्षिका

