# विकेंडटास्क
# गोष्ट दुसऱ्या लग्नाची (३०/१/२०२६)
किडनॅप……
मयूरी ऑफिस मधून घरी निघाली. एक कार तिच्या जवळ थांबली. तिला काही कळायच्या आत त्यातून दोघे खाली उतरले व तिला जबरदस्तीने कारमध्ये बसायला लावले व कार भरवेगात निघाली. ती ओरडत होती पण कार मधल्या लोकांनी तिकडे लक्ष दिले नाही. कार शहरापासून दूर आली होती. आजुबाजूला अंधार पसरला होता त्यामुळे आपल्याला नक्की कुठे नेतात हे तिला कळत नव्हते.
जवळपास दोन तीन तासांनी कार एका बंगल्याजवळ थांबली. बंगल्याच्या आसपास तुरळक लोकवस्ती होती. तिला खाली उतरवले व ते लोकं कारमधून निघून गेले. बंगल्यातून तो तिचा नवरा सुबोध बाहेर आला. दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. सुबोधला बघून ती म्हणाली, हा काय प्रकार आहे? सुबोध म्हणाला, घरात चल… सगळं सांगतो.
ती आत आली. त्याने तिला पाणी प्यायला दिले व म्हणाला, शांतपणे बस. मी तुला काहीही त्रास देणार नाही…. फक्त मी जे काही सांगतो ते शांतपणे ऐकून घे. मयू…. मला माफ कर. मी खूप वाईट वागलो, तुला प्रत्येक गोष्टीत मी गृहीत धरले. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणजे माझी प्रत्येक गोष्ट तू मान्य करशील. हे मी गृहीत धरले. आणि तूही तुला पटो न पटो माझ्या इच्छेप्रमाणे वागत होतीस.
आणि ती माझ्या आयुष्यात आली….. माझ्यावर हुकूमत गाजवायची, हक्काने सर्व स्वतःच्या मनासारखे करून घ्यायची. तिच्या या अदांवर मी फिदा झालो. तुझ्यावर असलेले माझे प्रेम मी विसरलो. तू मला काकूबाई वाटायला लागलीस. तुझ्या सारखी शामळू पेक्षा आक्रमक ती आवडायला लागली. तिचा हेतू मी समजू शकलो नाही. तिच्या पायी मी वेडा झालो. त्या वेडात तिच्या सांगण्यावरून मी तुला घटस्फोट दिला. तिचा स्वार्थ पूर्ण होईपर्यंत ती माझ्याशी प्रेमाचे नाटक करत होती. पैसे, दागिने, स्वतःच्या नावाने घर घेतले. तिचे उद्दिष्ट पूर्ण झाले. ती तिचे खरे रंग दाखवायला लागली. आमची सारखी भांडणे व्हायची. तिने हे सर्व तिच्या मित्रांच्या मदतीने केले होते. एके दिवशी ती गेली ती परत आलीच नाही.
आमचे लग्न झाले नव्हते. आम्ही असेच एकत्र रहात होतो. ती गेल्यावर माझे खाडकन डोळे उघडले. आणि तुझ्यावर मी जो अन्याय केला त्याबद्दल अपराधी वाटायला लागले. मला तुझी प्रत्यक्ष भेटून माफी मागायची होती. मी तुला खूप वेळा फोन करून भेटायला बोलावलं पण तू आली नाहीस म्हणून मला तुला किडनॅप करून आणावे लागले. हे सांगताना तो खूप भाऊक झाला होता. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.
मयूरी पण त्याचे सर्व ऐकून हळवी झाली. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. घरच्यांचा विरोध असून लग्न केले होते. तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते. व त्याचेही आहे हे तिला माहीत होते. सुबोधने तिचे हात हातात घेत विचारले, तू माझ्याशी परत लग्न करशील. माझ्यावर विश्वास ठेव. तुला तक्रार करायला मी एकही संधी देणार नाही. मयुरीने मोठ्या मनाने त्याला माफ केले. दोघांनी कोर्टात जाऊन परत लग्न केले. जिथे दोघांनी एकमेकांना सोडले होते तिथून पुढे एकमेकांचा विश्वासाने हातात हात घेऊन संसार सुखाचा करायला दोघेही सज्ज झाले.
