#माझ्यातलीमी#ब्लॉगलेखनटास्क (५/१/२५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
तो चरणस्पर्श करत होता .
गांधारीची डोळ्यावरची पट्टी तशीच.
विजयी भव आशीर्वाद तोंडातनं बाहेर पडलाच नाही.
जीत त्याची वा हार धर्माची दोन्हीमुळे
आयुष्य बदलणार होतंच.
विना सेनेचा सेनापती.. अश्वत्थाम्याचा प्रतिशोध पुरा होणार होता की नव्हता??
दोन्हीमुळे आयुष्य पणाला लागलंच..कायमचं.
योद्धे संपून गेले पण प्रतिशोधाचे नवे पर्व चालू झाले.
विजय मिळाला पण बऱ्याच बाबतीत हारही झाली.
तिच्या वचनांसाठी तिन्ही प्रतिज्ञा भीमानं पुऱ्या तर केल्या
पण ती राणी झाली तेव्हा उगवलेला सूर्य कितीतरी योद्धयांच्या चितांच्या ज्वाळांनी काजळून गेला ..आणि कितिक विधवांच्या शापांनीही.
तिसरं महायुद्ध ही तेच सांगतं..काही गोष्टी मिळाल्या तरी नाही मिळाल्या तरी आयुष्यं बदलून जातात.
खरंच ,शांती म्हणजे दोन युद्धांच्या मधला अल्पविरामच.
आणि ही शांती खरंच शांती असते की नव्या युद्धाची बीजे रोवणारी अशांती असते??
आणि म्हणूनच अर्जुनाच्या मनातलं द्वंद्वयुद्ध परत परत आठवतं.. फिरून महाभारताच्या पर्वांची युद्धाला भाग पाडणाऱ्या शापवाण्यांची, सूडाच्या प्रतिज्ञांची उजळणी करायला भाग पाडतं.
उत्तर भगवंताच्या तोंडातून आलेलं.. भगवद्गीता
जी योग्य ठरते, अनुसरणीय ठरते.
कर्म करणं अटळ ..
फलित असतंच.. आयुष्य बदलणारं..
काही गोष्टी मिळणं..
काही गोष्टी सोडून द्याव्या लागणं..
काही लादल्या जाणं..
होय ना??
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
खाली दिलेल्या वाक्या वरून #ब्लॉग/#कथा लिहा

