काय भुललासी वरलीया रंगा…

# कथा लेखन टास्क (९/१२/२५)
# जस दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं….. हे वाक्य वापरून कथा.

काय भुललासी वरलीया रंगा….

साकेत व ओवी लग्न करून मुंबईला एका सोसायटीत रहायला आले. साकेत सकाळी ९ ला कामावर जायचा तो रात्री ८ पर्यंत यायचा. घरात खूप लोक असण्याची सवय होती आणि इथे फक्त हे दोघे. साकेत दिवसभर कामावर. घरातील कामे आटोपली की काय करावे तिला कळत नव्हते. नवीन असल्याने कोणाची ओळख पण नव्हती. ती खिडकीतून आला गेला बघत बसायची.

रोज दुपारी ठराविक वेळेला दोन बायका जाताना दिसायच्या व संध्याकाळी हातात बरेच सामान घेऊन यायच्या. एकदा एकीचे हिच्याकडे सहजच लक्ष गेले. तिने हात हलवून हाय केले. ओवीला खूप आनंद झाला. असे दोन चार वेळा झाले. मग ओवी त्यांच्या जायच्या वेळी खाली जाऊन उभी राहिली. त्या तिच्या जवळ येऊन म्हणाल्या, तुझे नाव काय? तू इथे नवीन रहायला आलीस का? ओवी म्हणाली, हो. माझे नाव ओवी साकेत कुलकर्णी. आमचे मागच्या महिन्यात लग्न झाले. माझे मिस्टर कंपनीत नोकरीला आहेत. मी नोकरी शोधतीये. तुम्हाला मी रोज जाताना येताना बघते. तुम्ही काय करता? मी शोभा आणि हि राधिका. आम्ही दोघी शेजारी शेजारी रहातो. आम्ही भाज्या निवडून, चिरुन, रोज ठराविक घरी देतो. काही घरून घेऊन जातात. तू उद्या ये आमच्या घरी. काम करताना गप्पा मारता येतील. ओवी म्हणाली, हो. नक्की येईन.

ओवीची व त्यांची छान मैत्री झाली. शोभा दिसायला अगदीच कुरूप होती. पहिल्या भेटीत ओवीला शोभा अजिबात आवडली नाही. पण शोभाचे वागणे, बोलणे व स्वभाव खूप चांगला होता. मेहनती होती व सर्वांना मदत करायची सवय होती. साकेत कंपनीच्या कामासाठी बाहेर गावी गेला होता व ओवीला अचानक ताप आला. ती झोपून होती. ती दिसली नाही म्हणून शोभा तिच्या घरी आली व तिला बरे नाही बघून तिला मुगाची खिचडी करून खाऊ घातली. संध्याकाळी डॉक्टरकडे नेऊन औषध आणले. त्या दिवशी ती रात्री ओवी कडेच राहिली. शोभाच्या गुणांमुळे ओवी तिच्या प्रेमातच पडली. ओवीला जाणवले की, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.

शब्द संख्या : २९९

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!