कविता लेखन

#माझ्यातली मी…
#कविता लेखन टास्क
#दि २९/७/२०२५
🌹नात्यांत अंतर 🌹

कधीकधी अंतर मोजता येत नाही ते,
साठून राहतं रिप्लाय न केलेल्या मेसेजमध्ये.
वाट पाहत राहिलेल्या कॉलमध्ये,
सॉरी, “बिझी होतो” या शब्दांमध्ये.

कधी काळी होती एक सुंदर वीण,
मैत्री आपली रेशीम जशी सप्तरंगी जीन.
हसलो, खेळलो वाटले दुःखाचे ओझे,
आज आठवता ते क्षण मन अजूनही भिजे.

कळलेच नाही कधी काय झाला गुन्हा,
एक शब्दाने तुटली किती गोड होत्या खुणा.
गैरसमजाची भिंत उभी राहिली अशी,
मैत्री आपली जणू फुटकी काच ती जशी.

आजही दिसते वाट तिथे उभा असतो मी,
कदाचित तूही येशील आशा बाळगतो मी.
वेळ गेली तरी जखम अजून ओली,
तुटलेली मैत्री इतकी मनाची का करते होळी?

अंधारात फिरतो जुन्या आठवांच्या संगती,
परत येईल का परतुनी जुनी आपली नाती?
प्रश्न मनातच राहतो उत्तर का नाही मिळत,
मैत्रीच्या आठवणींत डोळे आजही ओलवत.

निःशब्द भावनांचा तो एक ढिगारा झाला
जुनेच प्रश्न नव्या उत्तरांची प्रतीक्षा मनाला.
अबोला दुरावा काहीतरी मनात साचलेलं,
एक सोपं कारण पण बरंच काही लपलेलं.

प्रत्येक रिंगमध्ये एक हुरहूर असते,
अन् न उचललेल्या फोनमध्ये व्यथा रुजते.
वेळेअभावी तुटलेली नाती ती,
मनाच्या कोपऱ्यात जमा झालेली भीती ती.

न बोललेल्या शब्दांचं ओझं किती,
मूक वेदनांची साठवण फक्त राहती.
हे अंतर कसं मोजायचं कळत नाही,
फक्त ते वाढत जातं कमी कधीच होत नाही.
~अलका शिंदे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!