पुस्तक रिव्ह्यू स्पर्धा (२७/६/२५)
” समास” ज्योत्स्ना देवधर यांचा कथा संग्रह.
ज्योत्स्ना ताईंच्या कथा वाचताना लक्षात येते की, त्यांची चित्रमयी, अल्पाक्षरी, अर्थ पूर्ण भाषा, व भावना वाचकांपर्यंत पोहचवण्याची कला अफाट आहे.
आशया प्रमाणे त्यांची भाषा कधी तरल, तर कधी भावोत्कट, तर कधी नाट्यपूर्ण होते. भाषा जरी स्पष्ट असली तरी कधीही भडक भाषा वापरलेली नाही.
यातील कथा सर्व वयातल्या स्त्रीयांवर आहेत. त्यांचे भावविश्व, वेदना, संवेदना, अनेक समस्या, मनावरील ताण तणाव दाखवणार्या आहेत. त्यांची नायिका स्वत्वासाठी, अधिकारासाठी आपल्या अस्मितेसाठी लढणारी आहे पण तिच्या प्रतिकारात हिंसा नाही.
आजच्या बदलत्या काळानुसार ती एकतर्फी विचार न करता सर्व गोष्टींचा साधक बाधक विचार करून घरातली शांतता, मोठ्यांचा मान राखून विनाशाला टाळते. स्वतः च्या स्वातंत्र्यासाठी आपला संसार, घर, कुटुंब पणाला लावत नाही.
या कथांना सामाजिक संदर्भ आहे जसे कि, आजच्या काळात सूने प्रमाणे सासूचा पण छळ होतोय. वृध्दांचे प्रश्न, त्यांची दुख हि कथेत प्रसंगानुरूप आली आहेत.
या कथा संग्रहात अपूर्वा, मैत्रीण, आम्ही दोघी, एक दिवस, कलंदर, माघारी, विष- वेल, कोश, जुगार, तीर्थ, संदर्भ, भिंगुळवाणा व झुंबर अशा तेरा कथा आहेत. या सर्व कथा वाचकांना अंतर्मुख करतात व यावर विचार करायला लावतात.
या सर्व कथा अतिशय मनाला भिडणार्या व मनाला पटणार्या आहेत , कुठेही अतिशयोक्ती प्रसंग नाहीत. स्त्रियांच्या समस्या, भावनिक तडफड व तडजोड यासाठी सर्वांनी हा कथासंग्रह वाचावा. मला आवडला. तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.
