ऋण काढून सण नको या विषयावर लघुकथा. (२०/१०/२५)
ऐकावे जनाचे करावे मनाचे…..
आठ दहा दिवसांपासून महेश काळजीत आहे हे आई बाबांच्या लक्षात आले होते. रोज कोणाचे तरी फोन येत होते व महेश सांगत होता, नक्की दोन दिवसांत देतो. काल तर दोन मित्रही आले होते. चहा झाल्यावर आधी हळूहळू बोलणे ऐकू येत होते नंतर मित्रांचा आवाज चढला होता तेवढ्यात बाबा तिथे आल्याने ते निघून गेले.
आज ऑफिस मधून आल्यावर आई बाबांनी विचारले की, तुला कसले टेन्शन आहे का? हल्ली तू काळजीत दिसतोस. बाबा म्हणाले, आम्हाला सांग, आमची काही मदत हवी असेल तर सांग. महेशच्या डोळ्यात पाणी आले, म्हणाला, पियूचा पाच वर्षाचा वाढदिवस साजरा केला त्यात माझ्या कल्पने पेक्षा खूप खर्च झाला. आईविना पोर तिचा आतापर्यंत एकही वाढदिवस साजरा केला नव्हता म्हणून मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. तेव्हा मित्रही म्हणाले की, पियूचा वाढदिवस आपण दणक्यात साजरा करू तू पैशाची काळजी करू नकोस. तुला कमी पडत असतील तर तुला आता आम्ही देतो, तू नंतर सावकाश परत दे. त्यांचे ऐकून मी त्यांच्याकडून पैसे घेतले. आता मित्रांना पैसे परत हवे आहेत पण ते द्यायला माझ्याकडे नाहीत, म्हणून टेन्शन आले आहे. बाबा म्हणाले, किती द्यायचे आहेत? एकूण दोन लाख द्यायचे आहेत. काळजी करू नकोस, मी देतो तुला, पण एक लक्षात ठेव ऋण काढून कधीही सण साजरे करू नये व दुसऱ्यांच्या बोलण्या प्रमाणे करु नये. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. आई म्हणाली, झाले ते झाले, आता टेन्शन घेऊ नकोस. नेहमी सारखा मनापासून एकदा हसून दाखव. तो आईच्या गळ्यात पडून रडला व नंतर मात्र आईबाबांना हसून म्हणाला, थँक्यू.
शब्द : २४१
