# माझ्यातली मी #
***** मनभावन श्रावण *****
…….. आठवणीतील श्रावण………
…….. कथा मंगळागौरीची………
हसत हसत श्रावण आला
पावसाची साद देऊन गेला
गर्दी झाली दाट मेघांची
लाजत मुरडत सरी बरसल्या!
सर्वांचीच मने हर्षोलीत करणारा मास….. पहिल्या पावसात भिजायला लावणारा……
आदिती ही लग्न करून कुलकर्ण्यांच्या घरात आली. आल्हाद व ती संसारात रमून गेली. लग्नानंतरचे पहिले वहिले सणवार सुरू झाले.
….. हसत -नाचत -जरासा लाजत श्रावण हळुवार पावलाने आला. स्त्रियांच्या आनंदाला उधाण आले.
आदितिला पहिल्यापासूनच श्रावण महिना खूप आवडायचा. कारण या महिन्यात सणाची श्रृंखलाच सुरू होते. पहिल्यापासूनच तिला अभ्यासाबरोबर आईला कामात मदत करायला खूप आवडायचे. तिला देवाधर्माची सुद्धा लहानपणापासूनच आवड. त्यामुळे श्रावणी सोमवार सुद्धा ती मोठ्यांच्या बरोबरीने करू लागली. ती आईला नेहमी म्हणायची आई, मला श्रावण खूपच आवडतो गं. श्रावण म्हणजे आपल्या जीवनात नवचैतन्य आणून वातावरणही मोहक करतो . पावसाच्या हलक्याशा बरसणाऱ्या सरी… मधूनच कोवळ्या उन्हाची झाक… त्यात हिरवाईने नटलेला निसर्ग….. आई,हा महिना येण्याची मला खूपच आस लागते गं.
आई म्हणायची… बाळा तसंच असतं गं. सगळे सण जसे, श्रावणी शुक्रवार,श्रावणी सोमवार , मंगळागौर, नागपंचमी, राखी पौर्णिमा व कृष्ण जयंती हे खास स्त्रियांचे सण आपल्याला तोच आठवण करून देतो नं.
आता तर ती लग्न होऊन सासरी आलेली. पहिला वहिला श्रावणी शुक्रवार याचेही महत्व तिला माहिती होतेच. देवाला गुळ फुटाण्याचा संध्याकाळी नैवेद्य दाखवून सवाष्णींना हळदी कुंकाला बोलाविले. नंतर लगेच आला तो श्रावणी सोमवार.
सासुबाई म्हणाल्या…. आदिती तू उपवास करते का? आदिती आनंदाने हो म्हणाली. आई, मला उपवास करायला खूप आवडतो. मी लहानपणापासूनच करते. तिने महादेवाची पूजा केली व १०८ बेलपत्री सुद्धा तिने वाहिली. आणि सासूबाईंना तिने सांगितले…. आई, मी एकच वेळ तिखट मीठ खाते बरं. त्यांना खूपच आश्चर्य वाटले. कारण आजकालच्या मुली असं काहीच करत नाहीत. ही नोकरी सांभाळून हे सगळं काही करते. त्यांना खूप बरे वाटले. आनंद पण झाला. त्यांनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरविला व म्हटले आदिती, उद्या पहिली मंगळागौर आपल्याकडची. तुला सुट्टी मिळेल ना? ती म्हणाली… हो आई काही काळजी करू नका . मी आधीच सुट्टी घेतली आहे.
आदिती,आई बाबा कधी येणार गं तुझे? आज येणार असतील न.
ती म्हणाली, आई बाबा संध्याकाळी सोमवार सोडून सकाळी निघतील. पोहोचतील नऊ पर्यंत.
आई ठीक आहे म्हणाल्या….
आई,गुरुजी केव्हा येणार आहे उद्या पूजेला? कारण आल्हादला तसे ऑफिसमध्ये सांगावे लागेल. त्याला पण बसावे लागेल ना आई पूजेला?
हो अगं, बसावे तर लागेलच. गुरुजी येथील दहा पर्यंत. हो का.. सख्या किती पर्यंत येतील? पोहोचतील ना वेळेवर?
आई हो म्हणाल्या…….
आदितीने सकाळी लवकर उठून चिल्लर चाल्लर कामे आटोपली व स्वतःच्या तयारीला लागली.
सुंदर जरी काठी साडी नेसून,लांब सडक केस असल्यामुळे एक वेणी घालून त्यावर सुगंधित मोगऱ्याचा गजरा माळला. छान मोठीशी टिकली लावली.सगळे दागिने अंगावर चढवून छानशी नाजूक नथ अपर्या नाकावर चढवली. आणि सासूबाईंना म्हणाली…. आई, कशी झाली माझी तयारी?
उत्तम…… 👌👌 सासुबाई म्हणाल्या.
हौशी सासूबाईंनी पूजेची पूर्ण तयारी करून त्या सुद्धा आदिती सारख्याच नटल्या. तशी पूजेला लागणारी सगळ्या प्रकारची पत्री आदितीने तोडून आणलेली होतीच. तिने आल्हादला पण लवकर तयार व्हायला सांगितले.
तेवढ्यात आदितीचे आई-बाबा आले. लेक एकदम खुश. अदितीची गोड तयारी बघून आई बाबा पण खुश. त्यांचा चहा नाश्तापाणी झाल्यावर गुरुजी व सख्या आल्यावर मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली. साग्र संगीत पूजा व जेवताना अबोल्याने पुरणाचे दिवे खाणे वगैरे…… सगळं काही आटोपले…..
संध्याकाळी हळदीकुंकवाला बायका येणार म्हणून सख्यांच्या मदतीने तिने महादेवाला उत्तम शृंगारित केले. आल्हाद जेवण करून टाटा, बाय-बाय करून ऑफिसला निघाला.
संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला. सासुबाई हौशी….. त्यांनी मंगळागौरीचे खेळ खेळायला एक ग्रुप बोलविला होताच. आदिती व तिच्या सख्यांना सुद्धा हे खेळ खेळता येत होतेच. मंगळागौरीचे खेळ खेळण्यापूर्वी ती सासूबाईंना म्हणाली…… आई, मी श्रावण मासावर एक गाणं म्हणू का?
त्या म्हणाल्या, अगं म्हण की.. तुझा आवाज पण खूप गोड आहे. तिने गाणे म्हणायला सुरुवात केली…….
हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला……
खूप गोड आवाजात गायलीस ग आदिती. सुंदरच……. सगळ्यांनी तिचे कौतुक केले.
मंगळागौरीचे खेळ खेळायला सुरुवात झाली. त्या ग्रुप सोबत आदिती व तिच्या सख्या ही होत्याच. आदितीने सुंदरसे नऊवारी नेसून मैत्रिणींनाही नऊवारी नेसायला सांगून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
पदर खोचून बायका खेळायला तयार.
पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा……. या गाण्यावर जबरदस्त खेळ खेळल्या.
लाटा बाई लाटा…… एकदम दणक्यात
किस बाई किस,दोडका किस….. दोडका किसतांना त्यात चाललेली जुगलबंदी….
आंबा पिकतो रस गळतो…… जबरदस्त
नाच ग घुमा,कशी मी नाचू……..
सगळ्यांचा आवाज……..
नाच ग बाई, जस येईल तसे नाच.
मंगळागौरीच्या खेळांचा कार्यक्रम जबरदस्तच झाला. आल्हादही तोपर्यंत घरी आलेलाच.
आदितीने सगळ्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायला सांगितले पण त्या अगोदर त्यांनी तिला उखाणा घ्यायला सांगितला.
…… उखाण्यात तर आदिती तरबेज. तिने लगेच उखाणा घेतला………
श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली आज, तुम्ही म्हणता म्हणून आल्हादच नाव घेण्याशिवाय दुसरा नाही इलाज.
……. आल्हाद समोरच होता. तो ऑ.. वाचून बघतो. उखाणा तर खूप आवडला… जरासा वेगळा. दिवसभरात शंभर वेळा नाव घेईल पण आता तर घेण्याशिवाय इलाज नाही म्हणते……..
पण भारीच ह उखाणा 👍👍👍……
नंतर आल्हाद चा नंबर उखाणा घेण्यात….
त्यानेही पटकन काही आढेवेढे न घेता उखाणा घेतला…..
एक -दोन- तीन- चार आदिती वर आहे माझे प्रेम फार………व्वा!जबरदस्त
सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊन निरोप घेतला. इकडे तिच्या सख्ख्या व ती मिळून मंगळागौरीची आरती केली. रात्रीच्या जागरणासाठी मैत्रिणींना थांबवून घेतले. पारंपारिक खेळ खेळून जसे फेर धरायचे,फुगडी, झिम्मा वगैरे करून मंगळागौरीचे अति उत्साहात जागरण करून कार्यक्रमाची सांगता केली……..
श्रावण सर ही वेगळीच धुंदी
या धुंदीत सदा रमतो आम्ही
श्रावणमासी विहरतो स्वच्छंदी
या मासी ना कधी विसरू आम्ही…….
……. अंजली आमलेकर…… २६/७/२५
