…… कथा अनोख्या जीवाची……

# माझ्यातली मी #
***** वीक एंड टास्क *****(१३/०३/२६)
…… कथालेखन…….
पुढील कथा तुमच्या शब्दात पूर्ण करा……..
लहानपणापासून राजन मुलांमध्ये रमतच नव्हता. त्याला मुलींसोबत खेळायला आवडायचे. रेवतीला वाटायचे लहान आहे. राजन मोठा झाला की समजेल. पण वयाच्या 12 व्या वर्षीही राजन मुलांमध्ये मिसळत नव्हता. एकदा घरी कोणी नसताना त्याने रेवतीची साडी नेसली. मेकअप केला. ते रेवतीने पाहिले आणि त्याला खूप मारले. राजन म्हणाला, आई मी मुलगी आहे अशी भावना मला आतून येते. राजन तृतीय पंथी होता. तो मोठा झाल्यावर काही किन्नर लोक येऊन त्याला घेऊन गेले. रेवतीनेही मोठे धाडस दाखवले. आपला मुलगा जसा आहे तसा त्याला स्वीकारले. त्या लोकांसोबतच तो सुखाने जगू शकतो. नाहीतर हा आपला समाज त्याचे हाल हाल करेल म्हणून रेवतीने मनावर दगड ठेवून आपल्या मुलाला आपल्यापासून दूर केले……. या संगीता मॅडमच्या ओळींवरून पुढील कथा…..

••••••••••••• कथा अनोख्या जीवाची •••••••••••••
जसे राजनचे बालपण संपून तो तारुण्यवस्थेत आला त्यावेळेला त्याच्या शरीरात होणारा बदल हा त्याला त्याच्या मनापासून दूर नेत आहे असे रेवतीला जाणवायला लागले. त्याची मुलींसारखी चालण्याची लकब, मुलींसारखे लाडिक बोलणे हे सगळे त्याच्या वागण्यातील बदल ती डोळ्याने पाहत होती. शाळेत गेल्यावर मुली त्याला अगं बाई तू काय करतोस? तू केस का वाढवतोस? बाई बाई तू मुलगाच आहेस न! अशाप्रकारे त्याच्यावर होणारी छि तू तिला इतरांकडून कळायची. त्याच्यावर स्वच्छतागृहात गेल्यावर आचकट विचकट पोरे त्याच्यावर अत्याचाराचा डाग लावून जायची. तो भीतीने इतका बेजार झाला की हे कोणालाही सांगण्याची हिंमतच त्याच्याजवळ नव्हती.
त्याच्या लहानपणी तो इतका सुंदर दिसायचा की रंगाने गोरापान, कुरळ्या केसांचा व घाऱ्या डोळ्यांचा राजन मोठा झाल्यावर जरा वेगळाच वागायचा. हात वर करून कंबर हलविणे, मधल्या सुट्टीत पोरींसारखे नाच करणे. त्यामुळे काही टारगट मुले भडक गाणी लावून त्याला चिथवीत असत. त्याला मध्ये उभे करून त्याच्याभोवती फिरून त्याला आचकट विचकट नाचायला लावत.
एकदा तर अंधाराचा फायदा घेऊन कोणी एकाने त्याचा करकचून मुका घेतला की त्याच्या ओठातून थोडे रक्त यायला लागले. शिक्षकांचे लक्ष जाताच त्यांनी त्याला समजाविले की बाळा जग हे असंच आहे. त्याच्याशी तुला सामना करायचा आहे. मनात भीती बसल्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ सरांसोबतच राहायचा.
जसजशी तारुण्यवस्थेची वर्षे वाढत होती तसतसे राजननी स्वतःच्या भावनेला समजून घेतले. तो ना एक मुलगा होता ना मुलगी. तो एक तृतीयपंथी ( किन्नर) होता. आईसाठी आपल्या रक्ताच्या मुलावर आलेली ही वेळ फार लाजिरवाणी होती. त्याला जवळ ठेवले तर लोकांचे टोमणे ऐकणे, त्यांची आपल्याकडे पाहण्याची नजर, त्याच्यावर होणारे अत्याचार रजनीला बघवत नव्हते. शेवटी तिने निर्णय घेतला की याला घरात थारा देणे योग्य नाही. तिने मनावर दगड ठेवून त्याला सांगितले बाळा, तू घरातून बाहेर पड. तुझा येथे निभाव लागणे कठीण आहे.
केविलवाण्या नजरेने त्याने आईकडे बघून तोंडावाटे ब्र न काढता तो बाहेर पडला. वाट फुटेल तिकडे तो जात होता. वाटेत जाता जाता तो एका अनोख्या जगात जाऊन पोहोचला. ते अनोखे जग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ती किन्नरांची टोळी होती.
तिथे गेल्यावर राजांना आपलं विश्व हेच आहे हे कळायला लागलं. किन्नरांची वसाहत हेच आपलं आता सगळं काही आहे. आता आईला पण पूर्णपणे विसरून जायचं. तिच्या आठवणीत अडकायचं नाही. तिला विसरलो नाही तर या दुनियेत आपला निभाव लागणार नाही असे त्याला वाटायचे. त्यांनी त्या टोळीला सांगितले की आता तुम्हीच माझे खंबीर साथी आहात. तुमचा हात मी कधीही सोडणार नाही. त्यांनीही त्याला आपणात आपलेसे करून घेतले व त्याचे नामकरणही केले. नंतर ती रंजना म्हणून समोर आली.
आईकडे असताना स्वतःच्या शरीरातील बदलांशी लढत असताना आपण शरीराने मुलगा आहोत पण मन मात्र स्त्रीत्वाकडे झुकले आहे असे त्याला वाटायला लागले. आपली येथे घुसमट होत आहे. आईने जो मार्ग दाखविला तो माझ्यासाठी उत्तमच होता. तसेही तिने मला गावच्या मातीत लढायला शिकविले. संघर्ष करायलाही शिकविले. माझ्यावर पश्चातापाची पाळी ही येणार नाही यासाठी मी आलेल्या प्रत्येक प्रसंगाशी लढणार. आता मी रंजना या नावाने वावरणार.
मानवी शरीराच्या नैसर्गिक अवस्थेत वावरताना ( किन्नर ) जसे टोळी करेल तसेच करणे भाग पडायचे. टाळ्या वाजवून सिग्नल वर लोकांकडून पैशाची भीक मागणे, न दिल्यास त्यांना शिव्या शाप देणे हे रोजचे दृश्य ती पाहत होती. हे सगळे करायला मन धजावत नव्हते. पण या समाजात राहायचे असेल तर पोटासाठी हे करावेच लागणार हे दर्शविल्या जायचे. पण तिने हे खूप दिवस चालू दिले नाही. आपण आपल्यासाठी तरी पायंडा बदलवू या हा निर्णय घेऊन पुढील वाटचालीसाठी निघाली.
सुरुवातीला संघर्षाशी तिला लढा द्यावा लागला. आपण आता स्वतःची वाट स्वतः निवडावी म्हणून जिद्दीने ती उभी राहिली व आपण अजून शिकून मोठे व्हायचे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे हे तिने ठरविले. पण समाज आपल्याला हे सगळे करू देईल का? हा प्रश्न तिला सतत भेडसावत होता पण जिद्द पणाला लावून शिक्षण सुरू असतानाच तिला एक वर्गमित्र मित्र म्हणून भेटला. जणू तो तिचा पाठीराखाच होता. शिकत असताना तिला खूप संघर्ष करावा लागला. त्यासाठी तिला तिच्या या वर्ग मित्राची रवीची साथ मिळाली ती जबरदस्तच.
पुढे ती एका उच्च विद्यालयात प्रोफेसर म्हणून लागली. लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआपच बदलला. ती हुशार असल्यामुळे व तिला संगणकाची आवड असल्यामुळे तिने मधल्या वेळात तो क्लास केला व त्यातही ती पारंगत झाली. त्यानंतर तिने संगणक काम घरूनच करायला सुरुवात केली. त्यातून तिचा जनसंपर्क वाढला. अनेक लोकांशी ओळखी वाढल्या. तिलाही आपल्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटायला लागले. समाजसेवेसाठी लक्ष निर्धारित करताना असे लक्षात आले की सामान्य लोकांसाठी भरपूर सेवा संस्था आहेत पण आपण ज्या अनुभवातून आलो त्या लोकांसाठी समाजसेवा करण्याची वानवा आहे. मग तिने त्याच क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. त्यात तिला रवीची साथ लाभली. त्यानिमित्ताने सरकारला व अनेक संस्थांना भेटू लागली. या कामातूनच पुढे अनेक जण या संस्थेशी जोडले गेले. त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सुरुवात झाली.
शिक्षण घेत असतानाच कोणीतरी काड्या करून पुस्तकातली पाने सुद्धा गाळ करायचे. कधीतरी रागाने, कधी तिला त्रास देण्यास. तिच्या आयुष्यातल्या उजाडपणाच्या गोष्टी करताना कधी रोमांचित असणाऱ्या तर कधी ती थट्टा मस्करी वाटायची. इकडून तिकडून छि तू व्हायची. आपलंच मन आपल्याला फाटल्यासारखं वाटायचं. सार्वजनिक अपमान तर ती नेहमीच सहन करायची.
तिचा वर्गमित्र रवी तिच्यासोबत वावरत असताना हळूहळू तिच्यातील सच्चेपणा, माणुसकी व स्वाभिमान बघून तो तिच्या प्रेमातच पडला. त्याने तिला बोलून दाखविले की आपण सहचारी बनू शकतो का?
तिच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह?
तो म्हणाला,
तू काही काळजी करू नकोस. आपण समाजावर मात करून टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रेमाचा विजय करू. आपण दोघे एका शुभ दिनी पूर्वसंध्येला विवाहबद्ध होऊन समाजासमोर एक आदर्श ठेवू. सहानुभूतीची अपेक्षा न करता समाजाकडून स्वीकार होईल व सन्मान सुद्धा. अगं, लिंगा पेक्षा माणुसकीचं पारडं मोठं असतं.
तिने होकारार्थी मान हलवली.
त्या दृष्टीने त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली व डॉक्टरने लिंग परिवर्तनाचा सल्ला दिला. वर्षभर चाललेल्या निरनिराळ्या शस्त्रक्रियेनंतर तिचे स्त्रीत रूपांतर झाले. शेवटी त्यांची दोघांची लग्न गाठ बांधल्या गेली व आता केवळ तृतीयपंथी म्हणून नाही तर एक आत्मनिर्भर स्त्री म्हणून ती जगासमोर वावरते.
……….. अंजली आमलेकर………..

error: Content is protected !!