कथालेखन
कथेचे शीर्षक:- ” आजी- आजोबांसोबतची श्रावण यात्रा!”
“आजोबा, किती कंटाळा आलाय या सुट्टीचा! काहीच नाहीये करायला.”, रिमझिम वैतागून म्हणाली. तिचा भाऊ रोहन सुद्धा तिच्या बोलण्याला दुजोरा देत मान डोलवत होता.
आजी हसल्या,” कंटाळा? अरे वेड्यांनो, बाहेर काय मस्त पाऊस पडतो आहे. झाडं पहा कशी हिरवीगार झाली आहेत. जरा बाहेर पहा हिरव्या रंगाच्या किती छटा दिसतायेत. आपलं घरही मस्त डोंगरा जवळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात. आता श्रावण महिना सुरू नाही का झाला?. सणांचा, उत्साहाचा आणि निसर्ग सौंदर्याचा!.
लोक मुद्दाम पावसाळी सहलीला जातात, डोंगरदऱ्यातून फिरतात. छोट्या-मोठ्या धबधब्यांचा आनंद घेतात, भिजतात, भाजलेलं कणीस त्यावर लिंबू मीठ लावून आणि वाफाळलेला चहा याचा आस्वाद घेतात.
आजोबांनी आपल्या चष्म्यातून पाहिलं आणि म्हणाले,” बरोबर आहे आजीचे. श्रावण म्हणजे फक्त पाऊस नाही तर ती एक अनुभूती आहे. मला आठवतंय लहानपणी आम्ही श्रावणाची वाट पाहायचो. जसा आषाढ सरला तसं ढगांच्या गडगडात सोबत श्रावणाचं आगमन व्हायचं. सगळीकडे नुसती हिरवळ पसरायची, जणूकाही पृथ्वीने हिरवागार शालूच नेसलाय आणि त्यावर विविध रंगी, विविध ढंगी रानफुलांची नाजुक वेलबुट्टी काढली आहे. झाडाची पानं पावसानं न्हाउन निघाली. त्यावरचे दवबिंदू मोत्यासारखे चमकणारे!. आणि प्राजक्ताच्या फुलांचा सडा तर मनाला अगदी वेड लावायचा”.
सर्वच सुगंधी फुले जणू श्रावणाच्या स्वागतासाठी फुललीत.
रिमझिम म्हणाली,” आजोबा, श्रावणात काय काय असतं विशेष?.
” अरे! खूप काही असतं. आजी म्हणाल्या,” श्रावण म्हणजे श्रावणी सोमवारचे उपवास. शंकराची पूजा!. कोणी लघुरुद्र, कोणी महारुद्र कोणी शंकराला अभिषेक करीत. शिवाय प्रत्येक सोमवारी शिवाला बेलपत्र, धोत्रा, शमीची पानं वहायचो. शिवामूठ व्हायची परंपरा असते. ज्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. नवविवाहित मुली आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही व्रतवैकल्ये मनोभावे करताना दिसतात.
आणि मंगळागौरीचे खेळ म्हणजे तर महिलांसाठी एक खास आकर्षणच! नटून, सजून, नऊवारी नेसून, रात्री जागरण करतात. फुगड्या, झिम्मा, पिंगा, बस फुगडी, आगोटं-पागोटं यासारख्या खेळांनी अंगण दणाणून जायचं. शिवाय व्यायामही व्हायचा बर का! नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात.
रोहन उत्साहाने म्हणाला,” आणि आई मला सांगत होती, नागपंचमी बद्दल! नागोबाची पूजा करतात म्हणे.
अगदी बरोबर ! आजोबा म्हणाले,” नागपंचमीला नागाची पूजा करतात कारण ते आपल्या शेताचे रक्षण करतात. पिकांचं नुकसान करणाऱ्या उंदरांना खातात. म्हणूनच त्यांना” शेतकऱ्याचा मित्र” म्हणतात बरं का! आणि दारोदारी गारुडी खरे नाग घेऊन यायचा, त्या खऱ्या नागाला आम्ही दूध, लाह्या फुटाणे द्यायचो.
“वा! मस्तच की, तुला भीती नाही वाटली आजी,”रोहन म्हणाला.
नाही रे, सोबत गारुडी असायचा ना. शिवाय मोठ्या मोठ्या वड, पिंपळ अशा झाडांना मोठे झोके बांधून झुलायचो, गाणी म्हणायचो.
“आजी, तुम्ही किती मज्जा केली त्यावेळी”, रिमझिम म्हणाली.
” हो तर! आकाशात ढग दाटून यायचे, थंडगार वाऱ्याची झुळूक यायची आणि झोके झुलायचे, तो अनुभव स्वर्गासारखाच!
नाहीतर तुमचे हे बांबू खुर्चीचे झोके, मागे गेलं की भिंतीला लागतं आणि पुढे गेलं तर फर्निचर….
सगळेजण हसतात.
तेवढ्यात आजीचं लक्ष समोरच्या डोंगराकडे गेलं. तिकडे बोट दाखवत म्हणाली,”अरे पोरांनो! तिकडे बघा लवकर मोर कसा पिसारा फुलवून नाचतो आहे.
आजोबा म्हणाले,” जणू काही तोही श्रावणाचं स्वागतच करतोय, आणि डोंगराच्या टोकाकडे पहा बरं, काय सुंदर इंद्रधनुष्य पडलय! जणू आकाशाने सप्तरंगांची कमानच टाकली आहे.
रिमझिम आणि रोहन बाल्कनीत धावले, खरोखरच नयन मनोहर दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.
आई, बाबा रोहन ओरडला.,”बघा ना किती सुंदर दिसते सगळं, लवकर या….
आई आणि बाबा आपल्या वर्क फ्रॉम होम मध्ये गढलेले होते. तेही बाहेर आले समोरचं दृश्य पाहताच भारावून गेले.
आजोबा हसले,” आपण या धावपळीच्या जीवनात निसर्गाचं हे सौंदर्य विसरूनच जातो. श्रावण याची आपल्याला आठवण करून देण्यासाठी आला आहे. तो आपल्याला शिकवतो की वेगाने धावणाऱ्या आयुष्यात थोडं थांबून निसर्गाचा ही अनुभव घ्या. सणांचा आनंद घ्यावा आणि नाती ही जपावी. कदाचित सर्वांनी एकत्र येण्यासाठीच या परंपरा, रूढी, व्रतवैकल्ये आणि सण निर्माण केले गेले .
आई म्हणाली,” खरं आहे बाबा तुमचं! कामाच्या गर्दीत या सर्वांकडे दुर्लक्ष झालंय खरं.
” श्रावण केवळ सण आणि व्रतवैकल्ये नाही.” आजी समजावून सांगू लागल्या. याच महिन्यात राखी पौर्णिमा ही येते. तिला नारळी पौर्णिमा ही म्हणतात. कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. तसंच हा सण बहिण भावांच्या अतूट नात्याचं प्रतीकही मानलं गेलंय. बहिण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचं वचन देतो. या सणांच्या मुळे आपण नाती जपतो आणि सणाचा आनंदही घेतो. या श्रावणातच माहेरवाशीणीला माहेरी जाण्याची ओढ लागते. हातावर सुरेख मेंदी काढली जाते, अंगणामध्ये रांगोळी सजते. हा मनभावन श्रावण नात्यांची आठवण करून देतो प्रेम, आपुलकीची भावना ही जागृत करतो. ”
“श्रावणात निसर्गाची किमया काही औरच असते. डोंगरदर्यातून कोसळणारे धबधबे, कलकलाट करीत वाहणारे झरे, सर्वत्र पसरलेला हिरवागार गालिचा, त्यावर विविध रंगी रानफुले, त्यावर बागडणारी रंगीत, मनमोहून घेणारी फुलपाखरे, किलबिलाट करणारे पक्षी हे सार काही मन मोहून टाकतं आतून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. असा हा सर्वांना आनंद देणारा मनभावन श्रावण. ढगांच्या गर्जनेसह पडणाऱ्या पावसाच्या सरी, झाडांवरून टपकणारे पाण्याचे थेंब, हे सार काही एक वेगळंच चैतन्य घेऊन येतं.
श्रावण म्हणजे जणू काही सृष्टीने केलेली हिरव्या रंगांची उधळणच!”
संध्याकाळ झाली, पाऊसही थांबला होता. आजी आजोबांनी नातवंडांसोबत आणि आपल्या मुलांसोबत श्रावणाबद्दल भरपूर गप्पा मारल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद.
रिमझिम म्हणाली,” आजी, आत्ता आल्याचा मस्त वाफाळता चहा आणि कांदा भजी मिळाली तर…..
तेवढ्यात आई चहा आणि भजी घेऊन आली. आणि इथेच आजी-आजोबांसोबत केलेली श्रावण यात्रा संपली. आजीने रेडिओ सुरू केला त्यावर गाणं लागलं होतं……
” श्रावणात घननिळा, बरसला………..”.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
