#माझ्यातली मी
#कथालेखन टास्क (१९/७/२५)
*घाव– बलात्कार की पीडीतेचा आवाज.
कथेचे शीर्षक,” घावातून उजेडाकडे”
रात्र होती, पण तिच्या आयुष्यात अंधार उजेडावर भारी पडलेला होता.
22 वर्षांची आर्या… बीए फायनल इयर. पुस्तकं, डोंगरदऱ्या आणि आईची ममता. एवढेच तिचं छोटसं विश्व होतं. ती सुंदर होती पण तिच्याच सौंदर्याची तिला जाणीव नव्हती. तिच्या बोलण्यात, डोळ्यात एक प्रकारची निरागसता होती.
त्यादिवशी कॉलेज संपल्यावर ती तिच्या लहानशा स्कुटी वरून निघाली होती. नेहमीसारखीच तिन्ही सांजेची वेळ. जवळच चहाची टपरी होती. मैत्रिणींनी चहा घेण्याचा आग्रह केला, पण ती म्हणाली,” नाही ग! आई वाट पाहत असेल आणि अंधारही पडू लागला आहे”.
पण त्या रस्त्यावर आज तिच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवलेलं होतं…..
एका सुनसान वळणावर तिला गाडी अडवून थांबवण्यात आलं. सुरुवातीला ती गोंधळी. नंतर हसतच एका मुलाला विचारलं काय झालं? पण क्षणी, त्या हसण्याचं भेसूर डरकाळीत रूपांतर झालं.
तिच्या विश्वासाचं, सुरक्षिततेचे वस्त्र फाडून पाच पुरुषांनी तिचं शरीरच नव्हे तर तिचं मन, आत्मा, स्वप्न सगळंच चिरडलं.
पाच जण होते. मद्य प्यायलेले, रागाने, अहंकाराने भरलेले, विकृत मनोवृत्तीचे. तिच्या किंकाळ्या त्या झाडाझुडपात हरवून गेल्या. शरीराने दिलेली झुंज खूप लहान होती, त्या पाशवी ताकदी समोर.
ती जबर जखमी अवस्थेत एका रस्त्याच्या कडेला सापडली. तिला दवाखान्यात नेण्यात आलं. काही वेळानं तिने डोळे उघडले पण एक शब्दही बोलली नाही. फक्त पंख तुटलेल्या पक्षासारखी निपचित पडून राहिली.
आई रडत होती, वडील गंभीर पण शांत होते. तिची मैत्रीण नम्रता तिच्या बेड जवळ दिवस रात्र बसून होती. डोळे पुसत म्हणाली,” आर्या, तू काहीही चुकीचं केलं नाहीस…. हा तुझा दोष नाही”.
पण आर्याच्या मनात अनामिक भावना धगधगत होत्या. लाज? राग? घृणा? की सर्व काही संपल्याची, हरल्याची भावना…..
असेच काही दिवस गेले..,..
कोणीतरी म्हणाले,” तिचं अफेयर असेल बहुतेक.”
कोणी म्हणाले,” सुनसान रस्त्यावर एकटी का आली?”.
घरात एक भयाण शांतता, घराबाहेर निरर्थक कुजबुज…
काही नातेवाईकांनी तर सुचवलं,” तिचं लग्न लावून देऊ, विसरून जाईल सगळं!”.
त्या रात्री आर्या आरशासमोर उभी राहिली. स्वतःच्या डोळ्यात पाहिलं. स्वतःशीच बोलू लागली.
मी का घाबरते आहे? कोणाला? मी का लपते आहे? मी का मौन आहे? तिच्या शरीरावरच्या जखमा भरत नव्हत्या, पण तिच्या डोळ्यात नवी आग जन्म घेत होती. आणि लढा सुरू झाला…..
तिने एफ. आय. आर. दाखल केली. पोलिसांनी विचारपूस सुरू केली. काही प्रश्न असे होते की, ते पुन्हा पुन्हा त्या रात्रीच्या भयाण क्षणांमध्ये नेऊन टाकत होते.
कपडे कोणते होते?
तू विरोध केलास का?
तू आरडा, ओरड का नाही केलंस?
आर्याने न घाबरता थेट उत्तर दिली…
हो, मी ओरडले, पण समाज गप्प होता.
हो, मी लढले, पण कायदा झोपलेला होता.
हो, मी रडले, ओरडले ही पण ते कुणाला दिसलं नाही आणि ऐकूही आलं नाही.
सात महिने कोर्टात धावपळ, मीडिया, झुंडी, स्त्री मुक्ती संघटना वाले, सततचे सवाल-जवाब, मानसिक ताण. असं असलं तरी आर्या झुकली नाही. तिला नम्रता तिची आई आणि तिची वकील दीपा यांचा खंबीर आधार होता.
शेवटी ती वेळ आलीच, कोर्टाने सर्व आरोपींना दोषी ठरवलं. जजने नमूद केलं…..
” या गुन्ह्याचा फक्त आरोपींवरच नाही तर समाजावरही परिणाम झाला आहे. अशा प्रकरणात पिडीतेचा आवाज न्यायासाठी फार महत्त्वाचा ठरतो”.
तिच्या डोळ्यात पाणी आलं….. पण पहिल्यांदाच त्या अश्रूत वेदना नव्हत्या तर विजयानंद होता.
आर्याने तिचं शिक्षण पूर्ण केलं. तिचं एम. ए .चा विषय ठरला- ” बलात्कारानंतर मानसिक पुनर्बांधणी आणि सामाजिक प्रतिसाद”.
तिने” मौनाचा आवाज” नावाचं एक एनजीओ सुरू केलं. जे बलात्कार ग्रस्त महिलांच्यासाठी समुपदेशन, कायदेशीर मदत आणि आत्मविश्वास पुन्हा उभारणीचं काम करत.
ती मुलींना सांगायची,” तुम्ही तुमचं मौन तोडा. जे घडलं त्यात तुम्ही अपराधी नाही, कुणी” बळी” नाही, तुम्ही एक लढणारी स्त्री आहात.
घाव घ्या, पण त्याचं रूपांतर शस्त्रात करा”.
इथेच कथा संपवून एक प्रेरणा सुरू….
एका मुलीने एकदा तिला विचारलं.
” ताई! तुला ते सगळं विसरता आलं का ग?”.
आर्या हसून म्हणाली,” मी विसरले नाही, पण मी आता त्यावरच उभी राहिले आहे. त्या रात्रीने मला तोडून फेकलं, पण त्याच रात्रीने मला नवा जन्मही दिला”.
सौ .स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Very nice story