#विकेंडटास्क (१३/३/२०३६)
#कथालेखन .
# पुढील कथा तुमच्या शब्दात पूर्ण करा.
लहानपणापासून राजन मुलांमध्ये रमत नव्हता. त्याला मुलींच्या सोबत खेळायला आवडायचे. रेवतीला वाटायचे लहान आहे राजन. मोठा झाला की समजेल. पण वयाच्या बाराव्या वर्षीही राजन मुलांमध्ये मिसळत नव्हता. एकदा घरी कोणी नसताना त्याने रेवतीची साडी नेसली, मेकअप पण केला. ते रेवतीने पाहिले आणि त्याला खूप मारले. राजन म्हणाला आई मी मुलगी आहे अशी भावना आतून मला येते. राजन तृतीयपंथी होता. तो मोठा झाल्यावर काही किन्नर लोक येऊन त्याला घेऊन गेले. रेवतीने मोठे धाडस दाखवले आपला मुलगा जसा आहे तसा तिने स्वीकारले. त्या लोकांसोबतच तो सुखाने जगू शकतो. नाहीतर आपला समाज त्याचे हाल हाल करेल. म्हणून रेवतीने मनावर दगड ठेवून आपल्यापासून त्याला दूर केले…….
©® संगीता देवकर.
कथेचे शीर्षक:- अस्तित्व!
(स्थळ:- रंजनाचे” उम्मीद” हस्तकला केंद्र. भिंतीवरती अनेक सन्मान चिन्ह आहेत आणि एका कोपऱ्यात राजनचा लहानपण चा फोटो. रंजना एक नक्षीदार ओढणीवर भरतकाम करते आहे. समोरच एक तरुण पत्रकार मुक्ता (मुक्त विचार मांडणारी) बसली आहे)
मुक्ता :- ” रंजना ताई! आज तुमचं नाव संपूर्ण राज्यात गाजतय. पण हा प्रवास सुरू झाला तेव्हा तुमच्या मनात काय होतं? जेव्हा आईने तुम्हाला घराबाहेर काढलं, तेव्हा राग आला नाही?”
रंजना :- (हळूच हसते, डोळ्यात जुन्या आठवणींची गर्दी दाटते.)
छे,ग! राग कसला, आईने मला घराबाहेर काढलं नाही तर तिने मला मुक्त केलं. त्यावेळी आम्हा दोघींनाही खूप वाईट वाटलं पण तिला ठाऊक होतं. या समाजाच्या बंदिस्त घरात माझा गुदमरून मृत्यू होईल. माझी घुसमट होईल. तिने मनावर दगड ठेवून मला त्या लोकांकडे सोपवलं. ज्यांना लोक,” किन्नर” म्हणून हिणवतात. खरं सांगू का मुक्ता, खरी लढाई माझी तिथूनच सुरू झाली.”
मुक्ता :- म्हणजे किन्नर समुदायात गेल्यावर सगळं सोप्पं झालं?
रंजना:- ” नाही ग! लोकांच्या नजरेत आम्ही फक्त”टाळी”वाजवणारे किंवा लग्नात नाचणारे किंवा सिग्नल वर पोटासाठी पैसे मागणारे खेळणेच. तुला माहित आहे. आमच्या समुदायातील सर्वात मोठी वेदना काय आहे? आम्हाला आजही,” भाड्याचे घर” मिळत नाही. आजारपणात,’ पुरुष’ वार्ड मध्ये जावं की,’ महिला’ हे ठरवताना डॉक्टरही गोंधळतात. आम्हाला अंत्यसंस्कारासाठी सुद्धा जागा मिळवताना संघर्ष करावा लागतो. ही आगतिकता मी जवळून पाहिली आहे”.
मुक्ता :- ” मग यातून मार्ग कसा काढलात? तुम्ही तर आता नावाजलेल्या उद्योजिका आहात?
रंजना :- ” एक दिवस मी ठरवलं टाळी वाजवून आशीर्वाद देण्यापेक्षा स्वतःच्या हाताने कोणाचं तरी नशीब बदलवू या. मी सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवले. सुरुवातीला तिथले साहेब मला पाहून हसायचे. पण मी त्यांना,” ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट”(२०१९) वाचूनच दाखवला. त्यांना सांगितले की, आम्हाला भीक नकोय तर सन्मानाने काम करण्याचा कायदेशीर अधिकार हवायं.” स्माईल” योजनेतून मी पहिलं कर्ज घेतलं आणि हे केंद्र सुरू केले. अत्यंत घाणेरड्या टिकांना सामोरे जावे लागले.
( अचानक दारावर टकटक होते. रंजनाचा भाऊ ज्याच्या जीव रंजनाने वाचवला होता. आत येतो त्याच्या हातात दोन डबे आहेत.)
भाऊ :- ” ताई ! आईने पाठवलंय म्हणाली रंजनाला वेळेवर जेवायला सांग आणि हो….. संध्याकाळी घरी लवकर ये. आपण नवीन घराच्या वास्तुशांतीला सोबतच जाणार आहोत.”
रंजना :- ” पाहिलंस मुक्ता? हाच तो भाऊ आहे ज्याने मला एकेकाळी ‘ आमच्या कुटुंबाचा कलंक’ म्हटलं होतं. यालाच रक्ताचा दुर्मिळ आजार झाला होता. तातडीने रक्ताची आणि” बोन मॅरोची” गरज होती. कुटुंबातील कोणाचे रक्त जुळत नव्हते. डॉक्टर म्हणाले वेळ कमी आहे. ज्या भावाने मला घराबाहेर काढण्यासाठी दगड मारले होते त्याच भावाच्या जीवासाठी मी रक्त द्यायला तयार झाले होते.
तेव्हा त्याला माझं रक्तच कामी आलं. रक्ताला लिंग नसतं ग! ते फक्त माणसाला माणसाशी जोडतं. आज सरकारने आम्हाला,” तीसरं लिंग”म्हणून ओळख दिली आहे. रेल्वेत जागा दिली, मतदानाचा अधिकारही दिला…… पण सर्वात मोठी लढाई मी तेव्हा जिंकले जेव्हा माझ्या कुटुंबाने मला,” ती” किंवा ” तो” म्हणून नाही तर” ताई” म्हणून स्वीकारलं.”
मुक्ता :- खूप छान ताई! पण अजूनही समाजात भीती आहेच…..!.
रंजना :- ” अगं, ती भीती नाही तर अज्ञान आहे. लोकांना वाटतं आम्ही शाप देतो पण आमचा खरा शाप हा आमचा” दुर्लक्षित आयुष्य” आहे. मी आता अशा मुलांसाठी काम करते आहे ज्यांना त्यांच्या पालकांनी नाकारले. माझं स्वप्न आहे की उद्या एखादा तृतीयपंथी कलेक्टर होईल, वकील होईल तेव्हा जगाला टाळी वाजवावीच लागेल पण ती भीक मागण्यासाठी नाही तर आमच्या कर्तुत्वाच्या कौतुकाची!”
रंजनाने विणलेली ती ओढणी पूर्ण झाली होती त्यावर तिने जरतारीच्या धाग्याने एक शब्द विणला होता,- “माणूस”.
कथा इथेच संपत नाही तर इथून सुरू होते. जिथे आपण एखाद्या किन्नराकडे पाहून नाक न मुरडता त्यांना रोजगाराची संधी देऊ. रंजनाचे जगणे हे सिद्ध करते की, निसर्गाच्या रचनेत कोणीही,” चूक ” नसते चूक असते ती फक्त पाहणाऱ्याच्या नजरेत.
” शरीर मातीचं,
लिंग निसर्गाचं,
पण अस्तित्व मात्र फक्त कर्तुत्वाचच असतं!”
सौ.स्मिता अनिल बोंद्रे.
©®
