#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (२३.६.२५)
एका छोट्याशा खेड्यातून पहिल्यांदाच वारीला आले होते तात्या आणि त्याचे कुटुंब. मुलं, नातवंड सारे मिळून १२ जण. कोणशीही ओळख नाही..!
आज माळावर मुक्काम. तुफान पाऊस, वारा..! कशीबशी राहुटी ठोकून आडोसा केला ! पण खायला काय?
इतक्यात एक उंचपुरे वारकरी जोडपे राहुटीपाशी आले..”माऊली, आसरा देता का? दोघेच आहोत आम्ही..”
तात्याने आत बोलावले खरे पण जेवायला काय वाढू ? दुःखी तात्याला पाहून दोघे म्हणाले, ” चला दोन दोन घास खाऊन घेऊ “..आणि शिदोरी सोडली..
रात्री तात्याच्या भारदस्त आवाजात भजन, गाणी झाली.दोघे वारकरी तल्लीन होऊन नाचत गात होते…
पहाटे उठून पाहतो तर काय..जोडपे गायब..!
तात्या गहिवरून म्हणाला, ” खरंच विठुराया..तुलाच काळजी प्रत्येक वारकऱ्याची…!”
शब्दसंख्या – १००
सौ. सुविद्या करमरकर
पुणे
