# विकेंडटास्क
# पुणेरी पाट्या
# विनोदी कथा (४/१/२०२६)
ऑफ पिरेड….
आज काळे मॅडम रजेवर होत्या म्हणून त्यांच्या ऐवजी सायन्सचे साठे सर दहावीच्या वर्गावर आलेले बघून सर्व विद्यार्थी नाराज झाले. आता या तासाला सायन्स शिकावे लागणार. साठे सर जरी सायन्स सारखा गंभीर विषय शिकवत असले तरी ते स्वभावाने खूप मिस्कील होते. ते सर्व मुलांचे चेहरे पाहून म्हणाले, तुमची परीक्षा जवळ आली आहे. तुम्ही सगळे मनापासून अभ्यास करता हे मला माहीत आहे. आज तुम्हाला जरा हसवून ताजेतवाने करतो. आज मी सायन्स न शिकवता पुणेरी पाट्यां बद्दल तुमच्याशी बोलणार आहे. आपल्या पुण्यातल्या पाट्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत.
तुम्ही पण जाता येता पाट्या वाचत असणारच. तेव्हा प्रत्येकाने एक
वाचलेली पाटी सांगायची आहे. मी माझ्या पासून सुरवात करतो.
आमच्या शेजारचा बंगला रिकामा आहे. त्याच्या मालकाने पाटी लावली आहे की, चोरांसाठी खास सुचना, बंगला रिकामा आहे. चोरण्या सारखे बंगल्यात काही नाही, तरी आपला वेळ व ताकद वाया घालवू नये. सगळी मुलं हसायला लागली. आभा म्हणाली रात्री अंधारात त्याला पाटी वाचता तरी येईल का? प्रणव म्हणाला की, त्याला लिहिता वाचता येत नसेल तर त्या पाटीचा काय उपयोग? माझ्या सारखा चोर असेल तर असल्या फेक पाटीवर विश्वास ठेवणार नाही राघव म्हणाला. तुमच्या शंका बरोबर असल्या तरीही शेवटी ती एक विनोद निर्माण करणारी व विचार करायला लावणारी पाटी आहे.
आता प्रत्येकाने वाचलेली एक पाटी सांगा… अभय म्हणाला, माझ्या ताईच्या वसतिगृहात पाटी आहे की.. आत्ये भाऊ, मावस भाऊ, लांबचा, जवळच्या, मानलेल्या सर्व भावांना इथे प्रवेश नाही. सगळे हसू लागले. निधी म्हणाली किमान राखी पौर्णिमा व भाऊबीजेला तरी परवानगी द्यावी नं. सर्वांचा हशा…..निशी म्हणाला, एका गार्डन मध्ये लावलेली भन्नाट पाटी…. शहाण्या कुत्र्यांना वेड्या माणसांनी इथे आणू नये. अरे याचा अर्थ काय? कोण शहाणी कुत्री व कोण वेडी माणसे…. साठे सर म्हणाले, तुम्ही गार्डन मध्ये जायला लागलात की कळेल.. यावर मुलं मुली एकमेकांकडे बघून हसू लागली.
मयुरी म्हणाली, आमच्या घराजवळ रोज संध्याकाळी वडापाव व भज्याची हातगाडी असते त्यावरची पाटी …. इथे गरम व ताजेच पदार्थ मिळतात. खाली लिहिले होते की…. इथे मुळव्याधीचे खात्रीशीर औषधं मिळेल. सगळे बाक वाजवून हसू लागले तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजवली आणि शाळा सुटली पुण्याची विनोदी पाटी फुटली. जगा वेगळा शाळेत ऑफ पिरेड साजरा झाला. साठे सर म्हणाले आपल्या वर्गावर पण पुणेरी पाटी लाऊया.. या वर्गात ऑफ पिरेडला पुण्याच्या पाट्यांचे वाचन केले जाईल. सर्व विद्यार्थी हसत टाळ्या वाजवत वर्गा बाहेर पडले.
