# विकेंडटास्क
# जाहिरात लेखन (२४/१/२०२६)
एक नूर आदमी, दसनूर कपडा…..
सकाळी सकाळी मानसीचा फोन, जयू…. आपल्या रमाचे लग्न ठरले. अरे व्वा… किती गोड बातमी दिलीस…. तारीख ठरली का? हो…. १५ एप्रिल. अगं म्हणजे जवळच आले की लग्न. हो तुला मदतीला यायचे आहे… हे काय सांगायला हवे का? तुझ्या लेकीचे लग्न म्हणजे माझ्या भाचीचेच लग्न.
ऐकन…. जयू, आम्ही पुढच्या रविवारी तुझ्या अरूश्री कलेक्शनला येणार आहोत. जाहिरात बघितली मी…. साड्या, ड्रेस मटेरियल, ड्रेस, जीन्स, टाॅप…. नवीन स्टाॅक आला आहे म्हणून. हो गं…. आता लग्नाचे दिवस सुरू झालेत. त्यामुळे सर्व रेंजमध्ये व खूप व्हरायटीत नवीन स्टाॅक आला आहे. शिवाय तुला अजून काही वेगळे हवे असेल तर सांग मी मागवते. शरारा किंवा वनपिस प्रकारात व्हरायटी आहेत का? खूप खूप व्हरायटी आहेत. हल्ली यालाच जास्त मागणी आहे. तुला वेळ असेल तेव्हा तू एकटी ये तुला सर्व प्रकार दाखवते. तुला हवे तसे मागवते. ओके…. मी उद्या दुपारी येते.
मानसी ठरल्याप्रमाणे आली. तिला मी सांगितले की, माझ्या कडे एक वर्षाच्या मुली पासून नव्वद वर्षांच्या आजी पर्यंत सर्व स्त्री वर्गा साठी वेगवेगळ्या रेंजचे अनेक प्रकार आहेत. रेडीमेड नववारी साड्या पण आहेत. मानसीला मी सर्व विभागातून फिरवत , तिथल्या साड्या, ड्रेस, टाॅप, जीन्स, शरारा,वनपिस, घागरा चोली,फ्राॅक, नऊवार साड्या , रेडीमेड साड्या, आता तर रेडीमेड पाचवारी साड्या विंथब्लाऊज खूपच मागणी वाढली आहे, त्यामुळे मी त्यापण ठेवते. अशी रनिंग काॅमेंट्री करत माहिती देत होते. माझे कलेक्शन बघून तिचा आनंद तिच्या चेहर्यावर दिसत होता.
अगं… जयू, तुझ्या इथे मला हवे ते सर्व प्रकार आहेत. आम्ही रविवारी येतो व तुझे कलेक्शन लुटून नेतो. नक्की ये. या व्यतिरिक्त अजून काही हवे असेल तर सांग. मानसी, सर्व ग्राहकांना १०% डिस्काऊंट आहे. पण तुला २५% डिस्काऊंट मी देणार आहे. व माझ्या तर्फे तुला एक पैठणी व रमाला जे आवडेल ते माझ्याकडून भेट आहे. तुझ्या सासूबाई व आईसाठी नऊवारीत पण पैठणी आल्या आहेत त्यात ५०% डिस्काऊंट मी देणार आहे. पैशाची काळजी करू नकोस. सावकाश दे.
ठरल्याप्रमाणे मानसी तिच्या विहिणबाईंना, बहिणी, जावा, नणंदा, आई, सासूबाई व उत्सवमूर्ती रमाला घेऊन आली मनसोक्त खरेदी केली. जाताना मला म्हणाली, तुझे जे ब्रिद वाक्य आहे की, एक नूर आदमी तो दसनूर कपडा हे खरंच आहे. तुझ्या कलेक्शन मधले कपडे घालून आम्ही खरंच सुंदर दिसणार. हिच माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. लग्नाच्या दिवशी खरंच सगळ्या छान नटूनथटून नवीन कपडे घालून इकडे तिकडे मिरवत होत्या. रमा तर प्रत्येक साडीत उठून दिसत होती. माझी सखी एका डोळ्यात आनंदाश्रू व एका डोळ्यात लेक सासरी जाणार म्हणून अश्रू लपवत सर्वांना हवे नको बघत होती. ती दिसायला सुंदरच आहे पण आज लक्ष्मीचे तेज तिच्या चेहर्यावर दिसत होते. त्या सर्व एक नूर नारींवर माझ्या कलेक्शन मधले दसनूर कपडे चमकत होते.
