#माझ्यातली मी
#विकेंड टास्क कथा लेखन
#एक नवी सुरुवात = एक नवी पहाट
रमाच्या आयुष्यातील रंग दोन वर्षांपूर्वीच उडाले होते. पतीच्या अपघाती निधनानंतर पदरात तीन वर्षांची छोटी परी आणि जगाचे टोमणे एवढेच तिच्या वाट्याला आले होते. शिवणकाम करून ती कसाबसा आपला संसार रेटत होती, पण मनातील रिकामेपण काही केल्या भरून येत नव्हते.
सर्वात कठीण काळ असायचा जेव्हा परी तिला बाबाबद्दल प्रश्न विचारायची, “आई, सगळ्यांचे बाबा त्यांना शाळेतून आणायला येतात, माझे बाबा कुठे गेले ग? ते गावाला गेलेत तर अजून का आले नाहीत?”
रमा डोळ्यांतील पाणी लपवत हसून म्हणायची, “बाळा, बाबा खूप लांब ऑफिसच्या कामाला गेलेत. गप्पा मार ना माझ्याशी, मी आहे ना तुझी आई आणि बाबा दोन्ही!” पण परीचे समाधान व्हायचे नाही.
एकदा तर तिने हट्टच धरला, “आई, देवाला सांग ना बाबांना सुट्टी द्यायला. मला त्यांच्या सायकलवर बसायचंय.”
रमा आतून तुटत होती पण हसून याचा सामना करत होती. त्या रात्री परीला कुशीत घेऊन झोपलेली असताना, रमाला डोळा लागला आणि स्वप्नात तिला विनय दिसला. तोच हसरा चेहरा, तीच प्रेमळ नजर.
रमा रडत त्याला म्हणाली, “विनय, बघ ना आपली परी कशी बाबांसाठी व्याकुळ असते. मी एकटी पडले रे…”
तेव्हा विनयने तिच्या डोक्यावर हात ठेवला
आणि जणू तिच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर दिले,
“रमा, अडकून नको राहू माझ्या विझलेल्या चितेत,
माझ्या परीचे हसू शोध.मी तर गेलो,
पण तू तिला पुन्हा ‘बाबा’ नावाची सावली दे,
माझ्या आठवणींना निरोप देऊन,
तिच्या आयुष्यात नवी पहाट येऊ दे.”
विनयने जणू तिला या बंधनातून मुक्त केले होते. तो फक्त पती नव्हता, तर परीचा बाप म्हणून तिला ही विनवणी करत होता. रमा दचकून जागी झाली, पण आता तिचे मन शांत होते. तिने डोळ्यांतील अश्रू पुसले आणि मनात एक नवी पहाट उगवली.
दुसऱ्या दिवशी जेव्हा तिची बहीण सरिता तिला भेटायला घरी आली, तेव्हा रमाचा बांध फुटला…
रमा: “सरिता, मी किती दिवस तिला खोटं सांगू? ती आता मोठी होतेय. लोकांच्या नजरा, हा एकटेपणा… मला भीती वाटते गं. मला माझ्यासाठी नाही, पण माझ्या पोरीला बापाचं छत्र मिळावं असं वाटतंय.”
सरिता: “रमा, तू स्वतःला दोष देऊ नकोस. आयुष्य तिथेच थांबत नाही गं. ‘अंत अस्ति प्रारंभ’ असं आपण म्हणतो ना? मग तू एका नव्या आयुष्याची सुरुवात का करत नाहीस?
तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर परीला बाबा मिळतील आणि तुला आधार मिळेल. विनयच्या आठवणीवर किती दिवस जगशील.आता परी लहान आहे तोपर्यत ठीक नंतर तुला तिला सांभाळणं कठीण होईल समाज आहेच उत्तरं मागायला.
सुरुवातीला समाजात काय बोलले जाईल या भीतीने रमाने नकार दिला, पण परीच्या भविष्यासाठी तिने धाडस एकवटले.नातेवाईक शेजारी पाजारी यांचा विचार न करता लग्नाला तयार झाली.
तिच्या बहिणीने तिच्यासाठी अमोलरावांचे स्थळ आणले. त्यांचंही कुटुंब अपघातात गेलं होतं. एकटे पडले होते.
अमोलरावांची आणि रमाची भेट झाली. अमोलरावांनी पहिल्याच भेटीत परीला मांडीवर घेतले.
अमोल: “रमाजी, मला तुमची साथ हवीच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त मला या परीचा ‘बाबा’ व्हायचंय. चालेल का तुम्हाला?”
रमाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. साध्या पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी परी नवीन घरात बावरलेली होती. अमोल जवळ आले आणि त्यांनी परीला एक छान बाहुली दिली.
अमोल: “परी, आवडली का तुला?”अजून काही हवे असेल तर नक्की सांग बाळा!”
परीने संशयाने रमाकडे पाहिले. रमाने जवळ येत परीचे हात अमोलच्या हातात दिले आणि म्हणाली, “बाळा, हे बघ, तुझे बाबा आले. देवाने त्यांना कायमची सुट्टी दिलीय आता तुझ्यासाठी!”
परीने आनंदाने अमोलना मिठी मारली आणि म्हणाली, “बाबा, आता पुन्हा कामाला नका जाऊ हं!”
अमोलने तिला उंचावर उचलून घेतले. रमाला जाणवले की, तिच्या दुःखाचा अंत झाला असून एका सुंदर, सुरक्षित आयुष्याचा प्रारंभ झाला आहे. ज्या घरात सुतकी शांतता होती, तिथे आता परीच्या खळखळून हसण्याचा आवाज घुमत होता.
तात्पर्य: “लोक काय म्हणतील?” या भीतीने आयुष्य संपवण्यापेक्षा स्वतःच्या आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेणे महत्वाचे असते.समाजाच्या भीतीने स्वतःच्या सुखाचा त्याग करण्यापेक्षा, सत्याचा स्वीकार करून घेतलेला नवा निर्णय आयुष्यात पुन्हा नवी पहाट फुलवू शकतो.
~अलका शिंदे

