#एक नवीन सुरुवात “आठवणींची एक्झिट

inbound1624484078806007480.jpg

#​एक नवीन सुरुवात
#”आठवणींची एक्झिट”

खरच एक नवीन सुरुवात जुन्या आठवणींच्या साथीने आणि नव्या नात्याची गुंफण!..

​”आई, आपण किचनमध्ये थोडा बदल करूया का? जास्त काही नाही, फक्त ज्या वस्तू आता खूप जुन्या झाल्या आहेत, त्या जागी नवीन आणूया!

आजकाल बाजारात किती छान आणि आधुनिक वस्तू आल्या आहेत. अगदी माफक दरात ब्रॅण्डेड वस्तू घरी बसल्या बसल्या मिळतात!”
​”वाटल्यास तुमच्याच पसंतीचं घेऊया, बघता का एकदा?”

मृण्मयीने म्हणजेच माझ्या सुनेने अगदी लाडिकपणे जवळ येऊन विचारलं.
​तिच्या हातात मोबाईल होता आणि तिने स्क्रीन माझ्यासमोर धरली. तिने चक्क नवीन चहाचं पातेलं, दुधाची भांडी, चहा-साखरेचे डबे आणि एक मॉडर्न कुकर निवडून ठेवला होता.

पण ते पाहताच माझ्या मनाला थोडं खटकलं. ‘बदल? आणि तोही माझ्या रोजच्या वापरातल्या भांड्यांचा?’ हा विचार मनात चमकून गेला.
​मी ओठांवर कसंनुसं हसू आणलं आणि म्हटलं, “हो ग, तुला हवंय तर कर बदल.”

पण म्हणतात ना, आपण कितीही खोटं बोललो तरी चेहरा खरं सांगून जातोच. त्या जुन्या स्वयंपाकघरातील ओट्यावरील चहाच्या पातेल्याकडे पाहताना माझे डोळे पाणावले.

​किती वर्षं त्यात मी चहा उकळला होता, किती पाहुण्यांचा पाहुणचार त्या भांड्यांनी पाहिला होता! तो जुना कुकर, ज्याच्या शिट्टीने माझ्या घरातील सदस्यांच्या वेळा ठरवल्या होत्या.

चहा-साखरेच्या डब्याला तर सासूबाई, सासरे, नणंद, माझी आई, बहीण अशा कितीतरी जणांनी हाताळले होते.

​दुपारी घरात कोणी नसताना मी जणू या भांड्यांशी संवाद साधायचे. भांडी घासताना, स्वयंपाक करताना अगदी जेवताना सुद्धा प्रत्येकाची ताट-वाटी आणि पाण्याचे भांडे देखील ठरलेले असायचे. ही भांडी माझ्यासाठी फक्त वस्तू नव्हत्या, तर त्या माझ्या तरुणपणाच्या संघर्षाच्या साक्षीदार होत्या. या वस्तू घेताना मला किती तडजोड करावी लागली होती, हे फक्त मलाच ठाऊक होतं.

​मृण्मयीने माझा तो पडलेला चेहरा अचूक टिपला. तिला समजलं की आईंना हे मनापासून पटलेलं नाही. तिचा मघाचा उत्साह क्षणात मावळला. ती काहीच बोलली नाही, पण हळूच मोबाईलवर केलेली ‘ऑर्डर कॅन्सल’ करू लागली. तिची ती शांत नाराजी माझ्या मनाला जास्त स्पर्शून गेली.

​माझं मन अचानक चाळीस वर्षं मागे गेलं. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले. परिस्थिती किती बेताची होती! तेव्हा बाथरूममध्ये साधी बादली आणि मग घ्यायची सोय नव्हती. किराणा दुकानातून आलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या बरण्या आणि बाटल्या घासून-पुसून आम्ही त्यात पाणी भरून ठेवायचो. धान्य साठवायचो.

​एकदा मी पहिल्यांदा हिंमत करून, हौस म्हणून मुलांच्या अंघोळीसाठी एक छोटी निळ्या रंगाची बादली आणि निळ्या रंगाचाच मग विकत आणला होता. तेव्हा घरात केवढं ‘रामायण’ घडलं होतं!

​”काय गरज होती ही उधळपट्टी करायची? आणलं तर आणलं, पण सासू म्हणून विचारण्याची पद्धत असते की नाही? आमचं पण या जुन्यातच चाललंय ना! आणि आमच्या मुलांचे नव्हते असले चोचले!” अशा अनेक बोचऱ्या शब्दांनी माझं मन ओरबाडलं गेलं होतं.
​त्याकाळी बाजारात फिरताना कपड्यांच्या दुकानांपेक्षा बायकांची गर्दी भांड्यांच्या दुकानातच जास्त असायची.

चकाचक नवनवीन घाटातली भांडी पाहून मलाही मोह व्हायचा, हेवा वाटायचा. पण मनावर आवर घालून मी स्वतःला सवय करून घेतली होती की, आपल्या पसंतीची गोष्ट या घरात कधीच येणार नाही.

कालांतराने घरात भांडी आली खरी, पण ती यजमानांच्या मागे लागून आणि मुलांना पुढे करून हट्ट केल्यावरच! अजूनही त्या भांड्यांवर यजमानांची आणि मुलांची नावे दिमाखात मिरवत आहेत. स्वतःच्या आवडीने एखादी वस्तू घेणं तेव्हा स्वप्नच होतं.

​”मग आज काय झालं? मी देखील माझ्या सासूचीच परंपरा पुढे चालवू लागले का? नाही, हे शक्य नाही!” या विचाराने मी दचकले. मला जे दुःख तेव्हा मिळालं होतं, तेच दुःख आज मी माझ्या सुनेला नकळत देत होते. आपल्याला मिळालं नाही म्हणून सुनेलाही मिळू द्यायचं नाही, हा कुठला न्याय? ​मी मनातले नकारात्मक विचार झटकून तातडीने मृण्मयीजवळ गेले.

तिचा मोबाईल बाजूला सारला आणि तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “मृण्मयी, अगं वेडी आहेस का? कशाला रिटर्न करतेस? ही नवीन पातेली आणि कुकर खरंच खूप छान आहेत. तू हे नवीन सामान मागव आणि तुझं घर तुझ्या पद्धतीने सजव. तुझा आनंद माझ्या पसंतीपेक्षा मोठा आहे. तुझा आनंद तोच माझा देखील हरवलेला आनंद आहे ग!”

​तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला घट्ट मिठी मारली. “आई मागवू मग? अहो आज सेलचा शेवटचा दिवस आहे ना, थोड्या वेळातच येईल बघा पार्सल.”
​तिने ऑर्डर दिली. परत माझ्याजवळ येऊन माझा हात हातात घेऊन म्हणाली, “आई, मी देखील वायफळ खर्च करणार नाही. ही माझ्या संसाराची नवीन सुरुवात आहे. मी जुन्या-नव्या वस्तूंचा असा संगम करेन की, ते पाहून तुम्हालाही बरं वाटेल.

आई मला कळतंय तुमच्या मनात काय चाललं आहे. तुम्ही काही बोलला नाहीत तरी तुमचे डोळे बोलतायत. माझी आई पण या सर्व प्रसंगातून गेली आहे. अगदी तुमच्यासारखीच!”

​इतक्यात ‘ॲमेझॉन’चं पार्सल आलं. मृण्मयीने उत्साहात तो बॉक्स उघडला. त्यात चकाचक मोहक भांड्यांचा संच होता. एक फॅमिली पॅक! त्यात चहा-साखरेचे डबे, कुकर, चहाचं भांडं आणि छोटी-मोठी भांडी अगदी एकाच कुटुंबातील सदस्यांसारखी गुण्यागोविंदाने एकत्र बसली होती. ती भांडी पाहून क्षणभर मनात एक विचार चमकून गेला, ही भांडीदेखील कुटुंबाचा किती विचार करतात ना! प्रत्येकाच्या आकाराला आणि उपयोगाला तिथे किंमत होती.

​मृण्मयीने त्यातून चहाचं नवीन पातेलं बाहेर काढलं आणि म्हणाली, “आई, आज या पातेल्यात पहिला चहा तुमच्याच हातचा हवा बरं का!”
​मी त्या नवीन पातेल्याला हळदी-कुंकू लावून गॅसवर चढवलं. त्यात योग्य प्रमाणात चहा पावडर, साखर आणि चवीला किसलेलं आलं घातलं. चहाला एक वेगळाच सुगंध येत होता आणि तो नवीन पातेल्यात मस्त मनमोकळा उकळत होता.

​मी चहा गाळला. दोन कप घेऊन आम्ही दोघी बाहेर सोफ्यावर बसलो. मृण्मयीने तिचा कप माझ्या कपावर हलकेच टेकवला, “चिअर्स आई!” आणि आम्ही दोघी खळखळून हसलो.

​चहाचा एक घोट घेतला आणि मन प्रसन्न झालं. “आई, खरं सांगू? मला ना खूप टेन्शन आलं होतं,” मृण्मयी म्हणाली. “मला वाटलं तुम्हाला वाटेल की मी तुमचा अधिकार हिरावून घेतेय… पण आई, हे घर तुमचंच आहे, मी फक्त त्याला थोडा ‘मेकओव्हर’ देतेय.”

​मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं, “मृण्मयी, घराची खरी शोभा भांड्यांत नाही, तर आपल्यासारख्या दोन स्त्रियांच्या समंजसपणात आहे. तू बिनधास्त बदल कर, आता या स्वयंपाकघराची खरी मालकीण तूच आहेस!”

​वाफाळलेल्या चहाचा तो सुगंध घरभर दरवळत होता आणि त्या सुवासात जुन्या आठवणींचा आदर आणि नव्या नात्याचा विश्वास, दोन्ही अगदी घट्ट विणले गेले होते.
​हीच होती आमच्या घराची… ‘नवीन विचारांची नवीन सुरुवात!’
​समाप्त.

error: Content is protected !!