#माझ्यातली मी
#लघुकथालेखन टास्क
@everyone
शीर्षक = एक अधुरी प्रेमगाथा
साहिल आणि ईशा कॉलेजपासून सोबत होते. साहिलसाठी ईशा म्हणजे केवळ प्रेम नव्हतं, तर त्याच्या आयुष्याचं केंद्र होती. त्याने आपल्या भविष्यातील प्रत्येक स्वप्नात तिला गुंफलं होतं. पण त्याला फक्त अनाथ म्हणून नाकारण्यात आलं.ईशाचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरलं आणि एका क्षणात साहिलचं उभं जग कोसळलं.
ज्या दिवशी तिचं लग्न झालं, त्या रात्री साहिलने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. त्याला वाटलं, ज्याच्यासाठी आपण जगत होतो तीच गोष्ट मिळाली नाही, आता आयुष्यात उरलं काय? पुढचे काही महिने तो केवळ एका मृतदेहासारखा वावरत होता. खाण्यापिण्याचं भान नव्हतं की करिअरची ओढ.
पण एक दिवस, जुन्या सामानाची आवराआवर करताना त्याला त्याच्या शाळेतली एक डायरी सापडली. त्यात त्याने लिहिलं होतं— “मला मोठेपणी अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचं आहे.” प्रेमाच्या धुंदीत तो स्वतःचं हे मूळ स्वप्न पार विसरून गेला होता.तो मनाशी ठरवतो.
“तिच्या असण्याने आयुष्य फुलासारखं फुललं असतं,
पण तिच्या नसण्याने मला काट्यातून चालणं कळेल.
प्रेम मिळण्याने कधी सुख मिळते,पण न मिळण्याने,
जगण्याचं खरं गणित मला आता उमजेल…”
ईशा न मिळाल्यामुळे त्याच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढण्यासाठी त्याने स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं. त्याने शहराबाहेर एक छोटेखानी ‘घर’ सुरू केलं—अशा मुलांसाठी ज्यांना कोणी नव्हतं.
दहा वर्षांनंतर…साहिल एका मोठ्या संस्थेचा संस्थापक झाला. शेकडो मुलं त्याला ‘बाबा’ म्हणून हाक मारतात. एके दिवशी त्याच्या संस्थेत ईशा मूल दत्तक घेण्यासाठी येते. त्याची भेट ईशाशी होते.
ती आपल्या संसारात सुखी होती, पण साहिलच्या डोळ्यांतील समाधान पाहून तिने विचारलं, “साहिल, त्या दिवशी मी सोडून गेले म्हणून तू माझ्यावर रागवला आहेस?”
साहिल हसून म्हणाला, “सुरुवातीला वाटलं होतं की माझं आयुष्य संपलं. पण आज जाणवतंय की, तू मिळाली असतीस तर मी फक्त तुझा झालो असतो.पण तू मिळाली नाहीस, म्हणून आज मी या शेकडो मुलांचा होऊ शकलो. तुझ्या त्या न मिळण्यानेच माझं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकलं.”
तात्पर्य: काही गोष्टी मिळाल्या तर त्या नशीब उजळतात,
पण काही दुराव्यांच्या जखमाही, माणसाला घडवतात.
शब्दसंख्या 280 ~अलका शिंदे

