एकदाच यावे सखया

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क
#रसग्रहणगाण्याचे
#एकदाचयावेसखया

“एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद होऊनी मी जावे धुंद त्या स्वरांनी”

सायंकाळची रम्य वेळ आणि कुठून तरी “एकदाच यावे सखया तुझे गीत कानी” या विलक्षण आर्जवी गाण्याचे स्वर्गीय स्वर कानी पडतात आणि नकळतच आपण पण ह्या गाण्यात गुंगून हे गीत गुणगुणायला लागतो. ह्या गीताची जादूच गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर गारूड करून आहे.
हे गाणं ऐकून निश्चितच आपल्या मनाच्या तारा छेडल्या जातात.

हे अजरामर गीत १९९२ साली प्रदर्शित झालेल्या “आपली माणसं” या मराठी चित्रपटातील आहे. प्रसिद्ध गीतकार अशोकजी परांजपे यांनी अनेक गाणी लिहिली आहेत. त्यांच्या गाण्यातील सहज सुंदर शब्द हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हे गीत त्यांनी अगदी वेळ काढून खास शब्द वापरून लिहिलं आहे. ह्या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे आपल्या सर्वांचे लाडके संगीतकार माननीय अशोक पत्की ह्यांनी. सुमन कल्याणपूर ह्या माझ्या खूपच लाडक्या गायिका आहेत. त्यांनी ह्या गाण्याच्या शब्दांतील अर्थ आपल्या गोड गळ्यातून रसिकांपर्यंत पोहोचवून त्यांचे कान तृप्त केले आहेत.

प्रियकराला आपण नेहमी सखा म्हणतो. ह्या गाण्यात अशोकजी ह्यांनी “सखया” हा गोड शब्द वापरून गाण्याची लज्जत वाढवली आहे. सखया हा शब्द उच्चारताना ती विरहातील आर्जवी स्वरात गाणारी प्रेयसी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. सुमनजींचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा. हे गाणं मला आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्याला असलेली अतिशय साधीच परंतु सात्विक आणि गोड चाल.

मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये थोडे अंतर निर्माण झाले आहे. ते अंतर दूर होऊन पुन्हा एकदा सखयाचे गीत कानी यावे अशी त्या सखीची ईच्छा ती अतिशय व्याकुळ, आर्जवी स्वरात व्यक्त करते. सुमन ताईंनी ते भाव अतिशय तरल सुरावटीतून
व्यक्त केले आहेत. “पुन्हा गुज अंतरीचे हे कथावे व्यथांनी”. ही ओळ खूप काही सांगून जाते. दोघांमध्ये होणाऱ्या गुजगोष्टी आता पुन्हा व्हायला हव्यात. इतके दिवस मनात साचलेले सारं काही मोकळेपणी एकमेकांना सांगून व्यक्त व्हायला हवं. एकमेकांच्या व्यथा कथायच्या. ही कल्पना शब्दातून केवळ अशोकजीच मांडू शकतात. कवीच्या शब्दात खूप काही असतं.

प्रेयसीला एकदाच त्याला पहायचे आहे. हेच स्वप्न तिच्या खुळ्या आठवानी म्हणजेच आठवणींनी पाहिले आहे. “पुन्हा फुलुनी यावा” ह्या ओळीतील पत्की साहेबांच्या हळव्या सुरावटीचे सुमन ताईंनी अगदी सोनं केलं आहे. त्यांच्या गळ्यातून ही ओळ ऐकताना सात्विकपणा दिसून येतो. या गाण्याची खास आठवण म्हणजे मी एकदा बाहेरगावच्या ट्रेन ने प्रवास करत होते. मी एकटीच खिडकीतून बाहेर पाहत होते. खूप सुंदर निसर्ग सौंदर्य न्याहाळत असताना सहजच मी हे गाणे मनातल्या मनात गुणगुणत होते आणि नेमके तेव्हाच कोणाच्या तरी मोबाईलची रिंगटोन वाजली आणि हे गाणं मला ऐकू आलं. आपल्या मनात आलेलं गाणं नेमक्या वेळी ऐकायला मिळालं हा मला विलक्षण योगायोग वाटला आणि माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या.

“एकदाच यावे सखया” हे अजरामर गीत कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असंच वाटते.

©️®️सीमा गंगाधरे

23 Comments

  1. перепланировка нежилого помещения в многоквартирном доме [url=https://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya10.ru/]перепланировка нежилого помещения в многоквартирном доме[/url] .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!