#माझ्यातलीमी
#गणपतीविशेषटास्क
#सोशलटास्क
#आपल्याउद्यासाठी
सर्वांना हवाहवासा श्रावण महिना सुरू होतो आणि त्यातले सणवार आपण उत्साहाने साजरे करत असतो तेव्हाच आपल्याला सर्वांना वेध लागतात ते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा उत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचा वाटत असतो. घराघरात गणपती बाप्पा विराजमान होत असतात त्याचप्रमाणे ते मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्वरूपात देखील सगळीकडे स्थानापन्न होत असतात.
सध्या आपल्या सर्वांना भेडसावणारा बिकट प्रश्न म्हणजे पर्यावरण! दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल सगळीकडेच ढासळत चालला आहे. पर्यावरणाबद्दल बोलतात सगळेच पण त्यातले किती ते कृतीत आणतात हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरातील अथवा आपल्या मंडळाची आरास, सजावट दिमाखदार आणि सगळ्यांपेक्षा आगळीवेगळी असावी. ती जास्तीत जास्त आकर्षक आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी कशी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. परंतु आता फक्त आकर्षक सजावट बनवण्याकडे लक्ष न देता ती पर्यावरण पूरक असली पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं.
ज्यांच्या घरात गणपती बाप्पा येतो त्यांनी सर्वप्रथम बाप्पाची मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरिसची न आणता शाडूची अथवा कागदाच्या लगद्यापासून बनलेली आणावी. या मूर्तीचे विघटन पाण्यामध्ये सहजगत्या होतं. मखराची सजावट करताना थर्मोकोल अथवा हानिकारक प्लास्टिकचा अजिबात वापर न करता पुठ्ठा, रंगीबेरंगी कागद अथवा फुले यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे घरातील धान्याचा वापरही आपण सजावटीसाठी करू शकतो. सजावट अधिक आकर्षक करण्यासाठी आपण रंगीबेरंगी ओढण्या अथवा साड्यांचा वापर करू शकतो. गणपतीच्या मखरा भोवती तीव्र प्रकाशझोत असलेले लाईट्स सोडू नये. बाप्पाच्या मूर्तीसाठी आणि इतरत्र वापरण्यासाठी लागणारे रंग नैसर्गिक असावे याची काळजी घ्यायला हवी.
पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव पण ठराविक ठिकाणी साजरे होत असत. परंतु हल्ली गल्लीबोळातून ठीकठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव साजरा होताना दिसतो. अनेक ठिकाणी मोठमोठे मंडप उभारलेले असतात. कित्येकदा ते जाण्यायेण्याचा रस्ता सुद्धा अडवतात. सार्वजनिक गणपती बाप्पाच्या मंडपात पर्यावरण जागृतीला खूप वाव असतो. तिथे आजूबाजूच्या परिसरातील आणि काही ठिकाणी तर दूरदूर वरून अनेक लोक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येतात. त्या ठिकाणी उगाचच अवाच्या सवा पैसा खर्च करून सजावट करण्यापेक्षा अशा मंडपामध्ये थोड्या थोड्या अंतरावर छोट्या कुंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावता येतील. बाप्पाचे विसर्जन झाल्यावर तीच रोपे मोकळ्या जागेत नेऊन आपण त्याची लागवड करू शकतो. “झाडे लावा झाडे जगवा” हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्या योगे पार पडला जाईल.
त्याचप्रमाणे जिथे बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली असते त्या ठिकाणी उगाचच अनावश्यक लाइटिंग करून मोठमोठाले देखावे साकारण्यापेक्षा लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा याबाबत जागृत करता येऊ शकते. उदाहरणार्थ एका बाजूला एखादा दहा बारा वर्षांचा मुलगा शॉवर खाली वाहत्या पाण्याखाली आंघोळ करताना दाखवायचा. दुसऱ्या बाजूला त्याची आई त्याला समोर बसून पाण्याचे महत्व समजवताना दाखवायची. त्यांचे संवाद ध्वनीनिफितीवर सर्वांना ऐकवावेत उदाहरणार्थ ती त्याला सांगते,
“बाळा तुला माहिती आहे का आपल्याकडे 24 तास पाणी असतं म्हणून तुला पाण्याचे महत्व कळत नाही.”
“आई म्हणजे दुसऱ्या लोकांकडे २४ तास पाणी नसतं का ग!”
“हो बाळा. बऱ्याच ठिकाणी दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी येतं. काही शहरात सुद्धा आठवड्यातून तीन-चार वेळाच पाणी येतं. आपल्या महाराष्ट्रातल्या काही गावी तर लोक पाण्यासाठी हंडे कळश्या घेऊन मैलोनमैल पायपीट करत असतात. म्हणून तू सुद्धा आता रोज बालदीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करत जा बाळा.”
“आई तू सांगितलंस म्हणून मला कळलं. आता मी सुद्धा पाण्याचा वापर काटकसरीने करेन हां.”
रात्रीच्या वेळी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येतात. तेव्हा पर्यावरणासंबंधी जागृती निर्माण करणारी एखादी छोटी एकांकिका तेथील रहिवाशांनी सादर करावी. कसं असतं ना, काही गोष्टी नुसत्या वाचून अथवा ऐकून लोकांच्या पचनी पडत नाहीत. पण तेच जर दृकश्राव्य माध्यमातून आपण लोकांसमोर सादर करतो तेव्हा ते लोकांना आवडतं.
समाज म्हणजे तरी कोण! आपण सगळेच समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आपल्या सगळ्यांचे एक देशहितार्थ कर्तव्य आहे. आज आपण पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या संकटाला सामोरे जात आहोत. आपल्यातल्याच उद्याच्या पिढीसाठी आपण पर्यावरण रक्षणासाठी भरीव कार्य करायला हवं. निसर्गाशी एकरूपता दर्शवताना संत तुकारामांनी खूप आधीच म्हटलं आहे,
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे”
©️®️ सीमा गंगाधरे

सुरेख..लिंक शेअर करा FB what’s app war