#माझ्यातली मी
#लघुकथा लेखन
#विषय -आनंद
#नाट्यछटा
नाट्यछटा: आनंद
​पात्र:
*​वडील: ५५-६० वर्षांचे, शांत आणि अनुभवी.
*​नेहा: २५ वर्षांची, त्यांची मुलगी, चेहऱ्यावर चिंतेची छटा.

​(दृश्य: नेहा तिच्या माहेरी वडिलांसोबत अंगणात बसली आहे. तिच्या लग्नाला काही वर्ष झाली आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची हुरहूर जाणवते. वडील शांतपणे तिला न्याहाळत आहेत.)

*​वडील: (हळू आवाजात, नेहाच्या खांद्यावर हात ठेवत) “नेहा, काय झालं बाळा? इतकी उदास का आहेस? काही त्रास आहे का?”
*​नेहा: (लांब श्वास घेत) “नाही बाबा, तसं काही नाही. फक्त सारखं तेच तेच आठवतंय. सासरी गेल्यावर मी त्यांच्यासाठी इतकं केलं, पण त्यांनी त्याची किंमतच ठेवली नाही. आणि तिकडे कुणी माझ्याशी थोडं वाईट वागलं, तर ते पण माझ्या डोक्यात फिरत राहतं.”

​(नेहाच्या मनात सासूबाईंबरोबरचा एक प्रसंग आठवतो.
​नेहा: “आई, तुमच्या उपवासासाठी खास तुमच्या आवडीचा फराळ बनवलाय.”
सासूबाई: (एक घास खाऊन, नाराजीने) “हे काय नेहा? इतकी तिखट मिरची का वापरलीस? आता मला ऍसिडिटी होईल. माझं काहीच ऐकत नाहीस तू!”)

*​वडील: (तिच्या पाठीवरून हात फिरवत) “माझी सोन्यासारखी मुलगी आहेस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव. आनंदी जगायचं असेल ना, तर दोन गोष्टी विसरूनच पुढे जावे लागते.”
*​नेहा: (वडिलांकडे बघत) “कोणत्या बाबा?”
​वडील: “पहिली गोष्ट, तू इतरांसाठी जे काही चांगलं केलंस ते विसर. आपण कुणाचं चांगलं करतो, तेव्हा ते मनापासून करतो. त्याचा आनंद त्याच क्षणी मिळतो. नंतर त्याच्या बदल्यात काही मिळेल अशी अपेक्षा ठेवली, तर दुःखच होतं.”
​नेहा: “पण बाबा, मग आपल्याला कोणी चांगलं म्हणणारच नाही.”
​(नेहाच्या मनात नणंदेशी झालेला प्रसंग आठवतो.
​नेहा: “ताई, इतक्या रात्री घराबाहेर थांबणं मला बरोबर वाटत नाही.”
नणंद: “नेहा, तू उगाचच तुझ्या नवऱ्याकडे माझी तक्रार करत असतेस. तुझ्यामुळे माझ्यावर संशय घेतील लोक!”)

*​वडील: “अगं, लोकांची स्तुती ऐकण्यासाठी नाही, तर आपल्या समाधानासाठी चांगलं काम करायचं. तू इतरांना जे प्रेम दिलंस, जो आधार दिलास, तो आनंद तुझ्या आतमध्ये आहेच. त्याची पावती बाहेरच्यांकडून घेण्याची गरज नाही.”
*​नेहा: (डोळे पुसत) “आणि दुसरी गोष्ट?”
*​वडील: (शांतपणे) “दुसरी गोष्ट, इतरांनी तुझ्याशी जे वाईट केलं ते विसर. राग आणि द्वेष मनात साठवून ठेवणं म्हणजे स्वतःच्याच मनाला जखम करून घेण्यासारखं आहे. त्या वाईट अनुभवांना तू जितकं धरून ठेवशील, तितकं ते तुझ्या मनावर ओझं बनत जाईल. विसरून टाक त्या सगळ्या गोष्टी. त्यातून काही शिकता आलं असेल तर तेवढं घे आणि पुढे जा.”
*​नेहा: (वडिलांना मिठी मारत, तिच्या चेहऱ्यावर आता हसू उमटते) “बाबा, तुम्ही खरंच खूप मोठं गुपित सांगितलंत आज. मला वाटतं आता मी खऱ्या अर्थाने मोकळेपणाने जगू शकेन.”
*​वडील: (हसून) “माझ्या लेकीचा आनंदच माझ्यासाठी सगळं काही आहे. नेहमी हसत राहा, आणि या दोन गोष्टी विसरून नव्याने आयुष्य सुरू कर. माझ्या सोन्याच्या मुलीला पुन्हा हसरं पाहून मी पण आज खूप आनंदी आहे.”
​(नेहाच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू फुलतं आणि ती वडिलांकडे कृतज्ञतेने बघते. दोघेही एकमेकांकडे हसून पाहतात.)
​पडदा पडतो ~अलका शिंदे

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!