आधार

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क ( १८.७.२५)
#कथालेखन
#लिव्ह इन रिलेशनशिप – तुमचा दृष्टिकोन

आधार

रवी, राधा आणि त्यांच्या दोन मुली. चौकोनी कुटुंब ! रवी नुकताच खाजगी कंपनीतून निवृत्त, तर राधाने बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली. दोन्ही मुलींची लग्नं झाली आणि दोघी परदेशात छान संसारात रमलेल्या. आता मस्त उरलेलं आयुष्य निवांत घालवू असे म्हणतात; तोपर्यंत राधाला गंभीर आजार झाल्याचे समजले. शेवटच्या स्टेजला लक्षात आले आणि अवघ्या तीन महिन्यात राधा सोडून गेली.

सुरवातीला दोन दोन महिने मुलींकडे जाऊन आला रवी ! पण आता त्याला घर खायला उठू लागले. एकटेपणा जाणवू लागला. नैराश्य येऊ लागले. का, कशासाठी, कोणासाठी जगायचे ? असे वाटू लागले. मग एके दिवशी मित्राच्या सांगण्यावरून एका
‘ सिंगल्स ग्रुप ‘ मधे नाव घातले त्याने..!

आणि तिथे त्याची ओळख सुजाताशी झाली. गेली वीस वर्षे सुजाता एकटी मुलाला घेऊन रहात होती. रवी आणि तिची छान मैत्री झाली. फोन, मेसेजेस, भेटी वाढल्या आणि नकळत ते मनाने जवळ आले.
एकमेकांच्या सुखदुःखात, मानसिक आधार बनले..!

पण मुले, समाज काय म्हणेल हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. .! शेवटी रवीच्या मोठ्या मुलीने पुढाकार घेतला. मोकळेपणाने बोलली ती रवी आणि सुजाताशी ..! दोघांनी एकमताने सांगितले की ह्या वयात आम्हाला पुन्हा लग्न वगैरे करायचे नाही !
मग बहिणीशी आणि सुजाताच्या मुलाशीही बोलली ती..!

आणि तिने एक छान मार्ग सुचवला त्यांना.! आज वर्ष होऊन गेलं, ते ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ मधे आनंदाने रहात आहेत..

मला वाटतं, सकारात्मक दृष्टीने बघितले तर खरंच काय वाईट आहे त्यात ? आजकाल कित्येक मुलं परदेशात किंवा बाहेरगावी असतात. त्यांच्या एकट्या राहणाऱ्या पालकांना असा आधार मिळाला तर किती छान ! आपापल्या मुलांना, नातेवाईकांना व्यवस्थित वेळ देऊन, त्यांच्या मदतीला उभे राहून थोडं स्वतःसाठी पण छान जगता आलं तर जगण्याची उमेद मिळेल ! उर्वरीत आयुष्य सुकर होईल नाही का ?

सौ. सुविद्या करमरकर
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!