#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(१२/३/२६)
#कथालेखन
@everyone
लहानपणापासून राजन मुलां मध्ये रमतच नवहता. त्याला मुलीं सोबत खेळायला आवडायचे. रेवती ला वाटायचे लहान आहे राजन मोठा झाला की समजेल . पण वयाच्या 12 व्या वर्षी ही राजन मुलां मध्ये मिसळत नवहता. एकदा घरी कोणी नसताना त्याने रेवती ची साडी नेसली मेकअप केला ते रेवती ने पाहिले आणि त्याला खूप मारले. राजन म्हणाला,आई मी मुलगी आहे अशी भावना मला आतून येते. राजन तृतीय पंथी होता. तो मोठा झाल्यावर काही किन्नर लोक येऊन त्याला घेऊन गेले. रेवती ने ही मोठे धाडस दाखवले आपला मुलगा जसा आहे तसा त्याला स्वीकारले. त्या लोकां सोबतच तो सुखाने जगू शकतो नाहीतर हा आपला समाज त्याचे हालहाल करेल. म्हणून रेवतीने मनावर दगड ठेवून आपल्या मुलाला आपल्या पासून दूर केले.
©® Author Sangieta Devkar
#authorsangietadevkar
संगीता मॅम यांच्या कथेपासून पुढे …
🩵 अस्तित्वाची न्यायची लढाई … 🩵
लहानपणापासून राजन मुलां मध्ये रमतच नव्हता. त्याला मुलीं सोबत खेळायला आवडायचे. रेवती ला वाटायचे लहान आहे राजन मोठा झाला की समजेल . पण वयाच्या 12 व्या वर्षी ही राजन मुलां मध्ये मिसळत नव्हता. एकदा घरी कोणी नसताना त्याने रेवती ची साडी नेसली मेकअप केला ते रेवती ने पाहिले आणि त्याला खूप मारले. राजन म्हणाला,आई मी मुलगी आहे अशी भावना मला आतून येते. राजन तृतीय पंथी होता. तो मोठा झाल्यावर काही किन्नर लोक येऊन त्याला घेऊन गेले. रेवती ने ही मोठे धाडस दाखवले आपला मुलगा जसा आहे तसा त्याला स्वीकारले. त्या लोकां सोबतच तो सुखाने जगू शकतो नाहीतर हा आपला समाज त्याचे हालहाल करेल. म्हणून रेवतीने मनावर दगड ठेवून आपल्या मुलाला आपल्या पासून दूर केले.
एका छोट्याशा वस्तीत घरांची दाट गर्दी, सगळीकडे अस्वच्छतता, तिथल्याच एका छोट्या घरात राजन ला ते घेऊन आले. लाडगोडात आणि श्रीमंत नसले तरी सुखवस्तू घरातील राजनला शिसारी आली. तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.. पण इतक्या सगळ्यांना मात देऊन पळून जाणं अशक्यच होतं. त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. शेवटी त्याने माघार घेतली, मूक धरून शांत बसून राहिला. त्यातीलच त्याला चहा, पाणी दिलं, मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या मायेच्या स्पर्शात त्याला आपलेपणा जाणवला. पण तरीही तिथे राहणं त्याला पटत नव्हतं.
“मी तुमच्यासारखाच असलो तरीही इथे राहू शकत नाही .. मी माझं काय ते बघून घेईन, मला जावू द्या..’
“सारखा नाही सारखी .. आता मुलीसारखंच बोलायचं, वागायचं .. “, अमिता त्यांच्यातील मुख्य किन्नर आत येतच बोलली.
“पण मी असंच बोलतो लहानपणापासून ..”
“परत तेच.. बोलते .. , शिकशील हळूहळू ..”
“इथे माझं भवितव्य नाही .. मला वकील व्हायचं आहे.. इथे माझं कसं होणार..!!??” राजन उत्तराला.
राजनला सगळं समजावणं गरजेचं होतं. कारण बाहेरच्या समाजात त्याला कुणीही स्वीकारलं नसतं. त्याच्या इच्छा आकांक्षांना मूठमाती मिळाली असती. आता ही जबाबदारी अमिताची होती.
“राजन.. नाही.. रजनी.. आजपासून तुझं नाव रजनी. तुला जर तू मुलगी आहेस असं वाटतं तर मुलाचं नाव, तसं संबोधन का करायचं.. आजपासून तू रजनी या नावाने ओळखली जाशील. तुझा तू वेळ घे आणि एका आठवड्यात आमच्यासोबत पैसे मिळवायला सुरुवात कर. हेच आपलं जीवन आहे. बाहेरच्या जगात आपल्याला नेहमी तुच्छतेने वागवलं जातं, आपल्या स्वप्नांना, इच्छा आकांक्षांना काहीच मोल नाही, हे जेवढ्या लवकर स्वीकारशील तुझ्यासाठी चांगलं आहे.” एवढं बोलून आणि त्याच्यासोबत राहणार असलेल्या मीरा आणि राधा यांना त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगून अमिता निघून गेली.
राजनला काय करावं सुचत नव्हतं.. हे काय वाढून ठेवलंय आपल्या पुढ्यात..!!? मी आता वकील कसा होणार..?? याची चिंता त्याला सतावू लागली. आणि तो दिवस उजाडलाच .. रजनी बनलेला राजन त्याच्या सहकारी तृतीयपंथीयांसोबत निघाला. घरोघरी, दुकानात, रस्त्यावर टाळ्या वाजवून पैसे गोळा करणे, पैसे देणाऱ्यांना त्यांच्या डोक्यावरून ते फिरवून आशीर्वाद देणे, तर काही ठिकाणी चक्क अपमान झाला की त्यांना शिव्याशाप देणे असे हे सोबतच्या किन्नरांची वर्तणूक बघून अचंबित होत होता, फक्त त्यांच्यासोबत राहून तो बघत राहिला. घरी आल्यानंतर सगळ्यांनी तिला समजावलं .. तुलाही हे यायला हवं. हळूहळू जमेल तुलाही .. मग सवय झाली की काही वाटणार नाही.
पण रजनीला हे काहीही पटत नव्हतं. नाईलाज म्हणून ती रोज त्यांच्यासोबत जायची, फक्त शरीराने, मनाने मात्र ती तिथून पळून जायच्या विचारत असायची. त्यासाठी काय करता येईल याचं नियोजन करत होती. बारावी कॉमर्स मध्ये तिला चांगले ८० टक्के मिळाले होते. अभ्यासात हुशार होतीच, पण दैवाच्या या नियतीमुळे तिच्या शिक्षणात खंड पडणार होता, तिचं भविष्यच अंधारात दिसत होतं, पण तिने काहीही करून तिथून सुटायचा विचार केला.
संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याने बऱ्याच गोष्टी, ठिकाण तिला परिचित झाली. पैसेही भरपूर जमले, आणि एक दिवस ती सगळ्यांसोबत गेली पण परत आलीच नाही. या जीवनाला कंटाळून आपल्या घरी गेली असेल, कटु अनुभव आले की येईल परत असा विचार करून तिला शोधण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही.
एका दुकानात पैसे मागत असतानाच ती मागच्या मागे सुटली आणि तडक रिक्षा घेऊन एक एन. जी. ओ. गाठलं. बघते तर काय, त्या एन. जी. ओ. च्या आवारात काही गुंड शिरून शिवीगाळ करत आपले पैसे मागत होते. काय प्रकरण आहे याचा रजनीला काहीच थांगपत्ता लागत नव्हता पण त्या बिचाऱ्या अनाथ मुलांना याचा किती त्रास होऊ शकतो या जाणिवेने तिने एकटीने त्या गुंडांशी फाईट करून त्यांना पळवून लावलं. मुलांनी तिला आत नेलं. पाणी वगैरे देऊन आराम करायला सांगितलं. सायंकाळी एन. जी. ओ. चे चेअरमन श्री. व्यंकट नायडू आले त्यावेळी त्यांना मुलांनीच हा प्रकार सांगितला. रजनीशी बोलताना त्यांना तिची परिस्थिती समजली. तिची तिथे राहण्याची विनंती त्यांनी स्वीकारली. हवं तर आश्रमाचं सगळं काम करेल पण मला कृपया इथे राहू द्या अशी तिची विनवणी त्यांनी लगेच मान्य केली त्याला कारणही तसंच होतं.
नायडू हैदराबाद मधून महाराष्ट्रात आले होते ते आपल्या मोठ्या भावाचा शोध घ्यायला. विकासही राजन सारखाच होता. त्याचं तृतीयपंथी असणं त्याच्या वडीलांना मान खाली घालणार ठरलं आणि त्यांनी त्याला घरातून बाहेर काढलं. व्यंकट तेव्हा लहान होता, पण त्याला आपल्या भावाचा लळा होता. व्यंकट मोठा झाला, घरचा व्यवसाय होताच, आईच्या डोळ्यातील पाणी आणि असलेली भावाची काळजी बघून त्याने आईला शब्द दिला, “अमित दादाला मनाने याच घरात घेऊन येईन.” आणि व्यवसायाच्या वाढीसाठी म्हणून तो महाराष्ट्रात आला. इथे येऊन त्याने व्यवसायासोबत ही एन. जी. ओ. पण सुरू केली होती. त्यांना विश्वास होता, इथे अमित कधीतरी येईल आणि त्याला आईच्या डोळ्यातील आनंद परत आणता येईल. शिवाय मोठा भाऊ मिळाल्याचा आनंद, त्याची सोबत, त्याचं मार्गदर्शन ही त्याला मिळेल. दोघेही मिळून छान व्यवसाय सांभाळू.
एन. जी. ओ. मधे रजनीला सगळे मित्रत्वाने वागवू लागले, लहान मुलही तिच्याशी मोठ्या बहिणीप्रमाणे वागायचे. रजनीचा एक प्रॉब्लेम सुटला होता. मनाने राहायला मिळालं. पुढे शिक्षणासाठी काय..?? तोही प्रश्न नायडूंनी सोडवला. त्याचे सगळे कागदपत्र राजन या नावाने होते. त्यासाठी तो तृतीयपंथी असल्याचा दाखला मिळवण्यापासून तर त्याचं नाव बदलून रजनी या नावाने त्याचं वकिलीचं शिक्षण सुरू करण्यापर्यंत नायडूंनीच मदत केली. त्यांच्या असलेल्या भरपूर ओळखी कामी आल्या.
रजनी एल.एल.बी. च्या शेवटच्या वर्षाला होती. नायडू सोबत तिची चांगली मैत्री झाली होती. मोठ्या भावाप्रमाणे वाटायचे तिला, तशीच तिची ते काळजी घ्यायचे. तेव्हा एकदा रजनीने अनेक वर्षांपासून मनात असलेला प्रश्न त्यांना विचारलाच.. “माझ्यासारख्याला कुणी जवळ उभंही नाही करत. तुम्ही मला फक्त आसराच नाही दिला तर बरोबरीने वागवलं, माझ्या शिक्षणासाठी इतके प्रयत्न केले. मी खूप भाग्यवान आहे की माझी तुमच्याशी भेट झाली. पण तुम्ही वरून आनंदी दिसत असलात तरीही तुमच्या मनात काहीतरी खदखदत आहे असं वाटतं. मला बहीण मानता ना.. मग तुमचं मन मोकळं करा आता..”
“सगळ्यांचाच नशिबात मी तुला मिळालो तसं कुणी मिळत नाही. तसं असतं तर माझा अमित दादा पण तुझ्याप्रमाणे काहीतरी चांगलं शिकून मोठा झाला असता, आम्ही मिळून हे सगळं सांभाळलं असतं..” नायडूच्या डोळ्यात पाणी आलं. एवढा तटस्थ माणूस डोळ्यात पाणी आणतो, काहीतरी गंभीर आहे, रजनीला जाणवलं. त्याच्या बोलण्यातून तिला थोडा अंदाज आला, पण अंदाज करण्यात अर्थ नाही, म्हणून तिने त्याच्याकडून अमीत ची गोष्ट ऐकून घेतली.
नायडूला वाटलं रजनी तर इथेच राहते लहानपणापासून. आणि ती काही दिवस किन्नरांसोबतही होती, कदाचित तिने अमित ला बघितलं असेल. त्याने रजनीला अमित चा फोटो दाखवून विचारलं .. “कुठेतरी, कधीतरी बघितलं का तू माझ्या भावाला ..?” रजनीने आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला त्याला बघितल्याचं आठवत नव्हतं. “नाही हो..”
“एक मिनिट .. थांब थांब ..” असं म्हणत त्याने अमितचा साडीतला फोटो दाखवला..
“यांच्याकडेच तर होते मी .. अमिता बेन .. म्हणायचो आम्ही.”
नायडूला घेऊन रजनी अमिताकडे गेली. दोघा भावांची ओळख पटली, पण अमिताने घरी जाण्यास नकार दिला. “आता हेच आयुष्य झालंय. हवं तर मी आईला भेटायला येईन. तुझ्याशीही भेटत राहिन. पण मला फोर्स नको करुस.. हेच जीवन माझ्यासाठी योग्य आहे.”
“असं नका म्हणू अमिता बेन. तुमच्यासाठी नायडू दादा किती झुरत असतात. त्यांच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं आणि इतका चांगला भाऊ असताना तुम्ही नाही का म्हणताय..!?”
“रजनी, तुझं सगळं चांगलं होतं आहे याचा मला आनंद आहे. तू एक कर. वकील झाल्यावर आपल्या किन्नर जमातीसाठी, तृतीयपंथीयांसाठी कायद्यात ज्या काही सुधारणा करता येतील ते बघ, आपल्याला हक्काचं घर, धंदा, कायद्यात तरतूद, सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा मिळावी यासाठी प्रयत्न कर. मग मी नक्की जाईन व्यंकट सोबत.”
राजनीने हे चॅलेंज स्वीकारलं. किन्नरांसाठी कायद्यात तरतूद करण्यात आली. समाजात त्यांना एक माणूस म्हणून चांगली वागणूक देण्यात यावी यासाठी तिने तात्पुरती तरी स्वतःच्या भागात जागृती केली. हळूहळू ही जागृती ती संपूर्ण देशभर करणार होती आणि तिच्यासोबत आता अमिता, नायडू आणि इतर किन्नर देखील मदत करू लागले.
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (१३/३/२६)

