#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क.(१२/९/२५)
#कथालेखनटास्क
#अव्यक्तप्रेम
विषय _अपूर्ण प्रेमपत्र : अनेक वर्षांनी सापडलेले पत्र, जे कधीच पोहोचले नव्हते.
सकाळी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे राजन मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यावर वर्तमानपत्र चाळता चाळता गरमागरम चहाच्या घोटांचा आस्वाद घेत होता. त्याच्या मनात आलं रमाच्या हातच्या आलं घातलेल्या चहाची लज्जत काही औरच. इतक्यात स्वयंपाक घरातून रमाचा चेतावणी देणारा आवाज आला,
“अहो ऐकलंत का आज सुजयने आपल्या दोघांची मराठी सिनेमाची तिकिटं काढली आहेत. तीन वाजताचा शो आहे. तुम्ही तुमचं सगळं लवकर उरका. जेवल्यावर काय तुमची वामकुक्षी वगैरे असेल ती लवकरात लवकर आवरून वेळेवर जाऊया.” नाटकी स्वरात राजन म्हणाला,
“जशी आज्ञा बाईसाहेब.”
रमाने सांगितल्याप्रमाणे राजनने सारं काही लवकर उरकलं. वामकुक्षी घेण्या अगोदर कोणता शर्ट घालावं ह्याचा तो विचार करत कपाट उघडून पाहत होता. शर्टच्या घड्यांच्या सर्वात खाली एक शर्ट जो त्याने हल्ली कधी वापरलाच नव्हता. त्याच्या मनात आलं आज आपण हा शर्ट घालून निघूया. त्याने तो शर्ट अलगद बाहेर काढला आणि इस्त्री व्यवस्थित आहे की नाही म्हणून उघडून पाहिला. इतक्यात शर्टच्या घडीतून एक लिफाफा बाहेर पडला. त्याने तो उचलला आणि आतील कागद काढून पाहिला. पहिले शब्द वाचले आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.
“प्रिय मालू”!
पस्तीस वर्षांपूर्वी त्याने मालतीला म्हणजे त्याच्या मनातल्या मनात प्रेयसीपद बहाल केलेल्या मालूला लिहिलेले हे प्रेमपत्र होतं जे तो तिला कधीच देऊ शकला नाही. पत्र हातात घेतल्यावर त्याच्या डोळ्यासमोर त्याचा सारा भूतकाळ तरळून गेला. अठरा वर्षांच्या निरागस, खूपच सोज्वळ चेहरा असलेल्या मालतीची आठवण येऊन तो खूपच भावुक झाला.
मालती आणि राजन दोघेही एकाच वाड्यात लहानपणापासून एकत्र वाढलेले. दोघेही एकाच शाळेत जात होते. त्यांची मैत्री खूपच निखळ होती. अगदी लहान असताना शाळेतील इतर मोठे लोक त्यांना चिडवायचे. या दोघांची इतकी मैत्री आहे की बहुतेक पुढे जाऊन हे दोघं लग्न करतील असंच वाटतंय. त्यावेळी गोबऱ्या गालांची मालती चिडून त्या लोकांना म्हणायची,
“हट मी नाही राजनशी लग्न करणार. मला वाड्यातला नवरा नको. मला श्रीमंत बंगलेवाला नवरा पाहिजे आहे.”
“अगं मोठा झाल्यावर तो पण श्रीमंत होईलच ना. घेईल तुझ्यासाठी एखादा बंगला.”
त्या वेळी कोणाला माहिती होतं की ह्या छोट्याशा मालतीचे नवऱ्याबद्दलचे हे विचार कायम राहतील. जसजसे दोघं मोठे होत होते राजनच्या मनात मालती विषयी हळुवार भावना निर्माण होत होत्या. त्याच्या लक्षात आलं होतं की मालतीची आपली मैत्री केवळ मैत्री नसून आपण तिच्यावर मनोमन प्रेम करतोय. मालतीला या सगळ्याची काहीच जाणीव नव्हती. ती राजनकडे केवळ एक मित्र म्हणूनच पाहत होती. मालती तरुण झाल्यावर खूपच देखणी दिसायला लागली होती. निमगोऱ्या रंगाची, मध्यम उंचीची, सरळ लांब केसांची, काळ्याभोर डोळ्यांची मालती खूपच रेखीव दिसायची. लोकांच्या नजरेतून तिला आपल्या सौंदर्याची जाणीव होत होती आणि त्याचा तिला खूप अभिमान सुद्धा होता. काळासावळा राजन मात्र तिच्यापुढे शोभून दिसत नव्हता.
मालतीची स्वप्नं फार मोठी होती. तिला आणि तिच्या घरच्यांना खात्री होती की सौंदर्याच्या बळावर तिला नक्कीच श्रीमंत, सुंदर, बंगलेवाला नवरा मिळेल. राजन अभ्यासात खूपच हुशार होता. कॉलेजमध्ये तो नेहमी उत्तम मार्काने उत्तीर्ण व्हायचा. त्याच्या हुशारीमुळे तो कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि विद्यार्थी वर्गात खूप लाडका होता. मालतीला त्याच्या हुशारीचा तो आपला फक्त मित्र आहे एवढाच अभिमान होता.
यथावकाश मालू आणि राजन दोघेही पदवीधर झाले. मालूला पुढे काय शिकण्याची इच्छा नव्हती. राजनला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याच्या हुशारीमुळे प्रमोशन मिळत गेलं. त्याला वाटत होतं की आता योग्य वेळ आहे मालुजवळ आपल्या भावना व्यक्त करण्याची. आता तिच्या घरचे पण स्थळ पाहत आहेत. असं काही घडायला नको की आपण विचारण्याआधीच तिचं लग्न जमेल.
राजनला मनोमन वाटत होतं की आपण आपल्या भावना व्यक्त केल्यावर कदाचित मालतीला आपल्याबद्दल प्रेम वाटू लागेल. ती आपल्या प्रेमाचा स्वीकार करून प्रतिसाद नक्कीच देईल. त्याला कळत नव्हतं की आपल्या भावना मालू पर्यंत कशा पोहोचवायच्या. राजनने त्याच्या एका खास मित्राला त्याची ही अडचण सांगितली. मित्राने त्याला सल्ला दिला,
“हे बघ राजन तुम्ही दोघं लहानपणापासून एकत्र वाढला आहात त्यामुळे तू तिच्यासमोर प्रेमाबद्दल बोलू शकणार नाहीस. मला असं वाटतं की तू एक सुंदर पत्र लिहून तुझ्या भावना व्यक्त कर आणि ते पत्र तिच्याकडे पोहोचव.” राजनला ही कल्पना खूपच आवडली.
“खरंच ना हे मला काही सुचलच नाही. मी आता सुंदर गुलाबी कागदावर तिला छान पत्र लिहून माझ्या मनातल्या तिच्याबद्दलच्या सगळ्या भावना व्यक्त करतो.”
राजनने रात्री सगळे झोपण्याची खात्री करून एक खूप सुंदर गुलाबी लेटर पॅड घेतले. त्यावर त्याच रंगाची पुसट गुलाबाची फुले होती. “प्रिय मालू” अशी सुरुवात केल्यावर त्याला जे जे सुचलं त्याच्या मनातील सर्व भावना त्याने पत्रात उतरवल्या. जेव्हा त्याने स्वतः ते पत्र वाचलं त्यालाच आश्चर्य वाटलं आपण एवढे सुंदर पत्र कसं काय लिहू शकलो. अर्थात ही प्रेमाची जादू होती हे त्याला कळून चुकलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. राजनने विचार केला की मालू संध्याकाळी बागेत झोपाळ्यावर बसायला येईल तेव्हाच आपण तिला हे पत्र देऊ. मालूची स्वप्नं बघतच राजन झोपी गेला.
रविवार असल्यामुळे तो आरामात सर्व आवरत होता. इतक्यात “राजन, काका काकू सर्व लवकर बाहेर या” असं आनंदाने ओरडतच मालू घरात शिरली. राजन आणि काका काकू बाहेर आले,
“काय ग मालू आज इतका कसला आनंद झालाय तुला?”
“अरे राजन बातमीच तशी आहे. तू ओळख पाहू काय असेल!”
“काकूने तुझ्यासाठी एखादा नवीन दागिना घेतला असेल जो तुला कधीपासून घ्यायचा होता. बरोबर ना!”
“वेड्या, अरे माझं लहानपणापासूनचे स्वप्न आता खरं ठरणार आहे. माझं लग्न ठरलंय सुयश सानेशी. मला हवा तसाच तो मुलगा खूप श्रीमंत, बंगलेवाला आहे आणि दिसायला पण चांगला आहे. आपल्या वाड्यापासून थोडा दूर त्यांचा बंगला आहे आणि घरी फक्त तो आणि त्याचे आई-बाबा. इन मीन तीन माणसं. घरी नोकर चाकर, दारात दोन तीन गाड्या आहेत. सर्व सुखे हात जोडून उभी आहेत. हेच तर सर्व मला हवं होतं ना!”
राजनला कळतच नव्हतं मालूचे स्वप्न खरं होतंय म्हणून तिच्या आनंदात आनंद मानायचा की आपला स्वप्नभंग झाला म्हणून दुःख करायचं. नंतरचे काही दिवस राजन मालूसमोर हसून खेळून राहत होता आणि त्यालाही आनंद झाल्याचे भासवत होता परंतु त्याच्या अंतरीची वेदना तोच जाणत होता.
इतक्यात बाहेरून रमाचा आवाज आला,
“अहो आज तरी तुम्ही वेळेत निघणार आहात ना”
तिचा आवाज ऐकून राजन भानावर आला. त्याला वाटलं तेव्हा सुद्धा आपण वेळेतच आपल्या भावना व्यक्त करायचं ठरवलं परंतु मी नियतीच्या मनात दुसरच काहीतरी होतं. पत्राद्वारे किंवा कशामुळे आपल्या भावना मालुपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आपलं प्रेम आपण व्यक्त करू शकलो नाही. “कालाय तस्मै नमः” हेच खरं.
©️®️सीमा गंगाधरे

खूप छान
सुरेख कथा…होत अस कधी कधी
सुरेख कथा