अमानत

# माझ्यातली मी
# विकेंडटास्क
विषय….कथालेखन
दि.1 जानेवारी 26
# दुसऱ्या लग्नाची गोष्ट

अमानत

मनोहर थोरात आणि सुधाकर कदम दोघे जीवलग मित्र एकाच सोबत शिक्षण एकाच शाळेत शिक्षक त्यामुळे घरे पण जवळ जवळ घेतली.त्यांच्या दोघी पत्नी मालती आणि सुनीता पण मैत्रीणी झाल्या. मनोहरचा मुलगा शशांक अन सुधाकर ची मुलगी शर्मिला याच्यांत पण छान मैत्री होती.दोघेही आता तरुण झाले होते .शशांक नावाप्रमाणेच शांत तो न कळत शर्मिला मध्ये गुरफटत गेला पण भिडस्त स्वभावामुळे अजूनपर्यंत त्याने आपल्या मनातले बोलून दाखवले नाही. खरतर त्या दोघांची मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली तर त्यांच्या पालकांना हवी होती.शर्मिला मात्र नावाच्या विरुद्ध बंडखोर विचाराची…तिला तिच्या कॉलेज मधला सौरभ…साखर कारखानदार भाऊसाहेब सुर्वेंचा मुलगा आवडत होता.त्यामुळे ती शशांक च्या भावना ओळखू शकली नाही. सौरभ हा एक गुलहौशी तरुण होता.फॅशनेबल राहणीमान, मुलींशी गोड बोलणे ही त्याची खासीयत होती. या भपक्यावर शर्मिला भाळली. घरच्यांनी तिला खूप समजावले पण फायदा झाला नाही. शेवटी नाईलाजाने लग्नाला होकार दयावा लागला.
सुरवातीचे दिवस छान गेले.खाणे,फिरणे मौजमजा,शापिंग मस्ती मध्ये चालू होते. पण पुढे सौरभच्या वागण्यात फरक पडला. नतंर शशांक चे पण लग्न झाले. सुषमा सारखी शांत मुलगी त्याला सहचारिणी मिळाली. काही काळाने शर्मिला गर्भवती झाली../आता मात्र सौरभचा तिच्यातला रस कमी झाला.तरीपण ती त्याला समजावून घ्यायचा प्रयत्न करीत होती. एक दिवस अनर्थ झाला दारुच्या नशेत घरी परत येणाऱ्या सौरभचा अपघात होऊन तो जागेवरच मरण पावला.मनोहरला तसाही जावंई आवडत नव्हता .ते ताबडतोब शर्मिला ला घरी घेऊन आले.त्यांना तिचे मुल पण नको
होते पण आता त्याला जन्म देणे भाग होते.शेवटी ती वेळ आली .मुलगी झाली पण जन्मताच मृत झाली असे तिला सांगण्यात आले.या सर्व घडामोडींनी शर्मिला मात्र आयुष्यातून उठल्या सारखी झाली.तिने लांब डेहराडून सारख्या शांत ठिकाणी राहून मुलींची योगा टिचर म्हणून नौकरी स्विकारली.सर्वांशी संबंध तोडले कुणालाही तिचा पत्ता माहीती नव्हता.
शशांक चे आयुष्य पण स्थिरावले होते . पण नशीब वाईट सुषमाला गर्भाशयात कॅन्सर झाला .शेवटी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली .प्रिती नाव ठेवले.पण काही दिवसातच सुषमा देवाघरी गेली. शशांक प्रितीला खुप जपत होता .नुकतीच तिची बारावीची परिक्षा आटोपली अन तिच्या इच्छेप्रमाणे योग शिकण्यासाठी तो प्रितीला डेहराडून च्या सेंटरला घेवून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे सेटंरवर गेले. तिथे त्याला एक योग टिचर शर्मिला सारखी वाटली.शर्मिला ने आपला ठावठिकाणा कुणालाच सांगितला नव्हता. शशांक ने पण जुने आयुष्य विसरणेच ठिक म्हणून फारसा शोध घेतला नव्हता परंतू आता जसे वय पुढे सरकत होते तशी त्याला शर्मिला ला भेटायची ईच्छा होती कारण तिच्याशी बोलून एका मोठया गुपितातून त्याला मोकळे व्हायचे होते. शर्मिलाला पण शशांक ओळखीचा वाटला. प्रितीची ऍडमिशन करतांना तो शशांक च असल्याची खात्री झाली. सेंटरची कामे आटोपताच ती त्याला भेटायला गेली .प्रिती इतर मैत्रीणी सोबत ओळख करुन घेण्यासाठी गेली होती. दोघांनाही एकमेकांना पाहून आनंद झाला. सुषमाचे समजताच तिला वाईट वाटले.
शर्मिला बोलली माझ्या अल्लड स्वभावामुळे मी तुला ओळखले नाही तुझे प्रेम मला ओळखता नाही आले. सौरभ च्या खोटया वागण्याला फसुन स्वत:चे नुकसान केले.माझे बाळपण गमावले.
तिला थाबंवत शशांक बोलला …अग थांब किती बोलशील तू कशीही वागली तरी माझे तुझ्यावर मनापासून प्रेम होते अन त्याच प्रेमाला जागून मी तुझी एक अमानत जपून ठेवली आहे. ती तुझ्या ओटीत टाकण्यासाठी मी तुझा शोध घेत होतो.
ऐक…. तुझी डिलिव्हरी झाली तेव्हा तुझ्या बाबांनी माझी मदत मागितली .माझे तुझ्यावर चे प्रेम त्यांना माहित होतेच. ते बोलले हिला जे काही बाळ होईल त्याला अनाथाश्रमात नेवून देण्याची जबाबदारी तुझी.नाही म्हणू शकलो नाही .मुलगी झाली ताबडतोब अनाथाश्रमात आणली .तेथील मॅनेजर हे खूप दयाळू होते. त्याना बोललो की आज हिला तुमच्या कडे ठेवत आहे .ही अनाथ नाही. थोडी अडचण आहे .स्थिरस्थावर झाले की मी हिला घेवून जाणार ते कबुल झाले. इकडे तुला मात्र बाळ जन्माला येताच मरण पावले असे सांगितल्या गेले. योग्य वेळ पाहून मी तुला सागंणारच होतो पण त्या आधीच तूच गायब झालीस. शेवटी सुषमाला सर्व कल्पना देऊन मी मुलीला दत्तक घेतले. सुषमा पण तिची आई झाली.तीच मुलगी म्हणजे …प्रिती….तुझी मुलगी.
हे सर्व ऐकुन शर्मिला अवाक झाली. आपली मुलगी जीवंत असून बाबांनी आपल्या ला खोटे सांगितले.त्यांना या मुलीपेक्षा आपल्या मुलीचे आयुष्य महत्वाचे वाटले.या कारस्थानामूळे मी माझ्या मुलीला आईचे प्रेम देवू शकले नाही. ती बोलली…शशांक तुझे आभार कसे मानावे कळतच नाही.आज तुझ्या मुळे मला माझी मुलगी भेटली.
इतकावेळ दाराबाहेर उभी राहून आपल्या जन्माची कथा ऐकणारी प्रिती हे सर्व ऐकुन विचारात पडली कसा हा नशिबाचा खेळ आहे. सख्खी आई असून सुद्धा मला माहित नाही. अन ज्यांना मी जीवापाड जपते ते माझे वडील नाहीत. आता या दोन अभागी जीवांसाठी मलाच काही केले पाहिजे.
आतमध्ये जात ती बोलली मी तुमचे सर्व बोलणे ऐकले. मला कसे सागांवे असा प्रश्न पडू देऊ नका कारण जे झाल त्यात कुणाचीच काही चुक नाही . नशीब च तसे होते.पण आता मी नियतीचा हा खेळ बदलवणार आहे….तुम्हा दोघांचे लग्न लावून देणार
काय….दोघेही एकदम बोलले
आमच्या मनात असे काहीही नाही. आता तर इतक्या दिवसांनी एकमेकांना पहात आहोत.
प्रिती…हो माहीती आहे पण ऐके काळी तुम्ही चांगले मित्र तर होतात …तर आता ती मैत्री पुढे न्यायला काय हरकत आहे. मला बाबा तर आहेत माझी हक्काची आई पण मिळेल जी माझी सख्खी आई आहे.
प्रिती च्या अशा बोलण्याने त्या दोघांच्याही मनाची गुतांगुत झाली .शेवटी शशांक च बोलला…शर्मिला माझे तुझ्यावर प्रेम होते, आजही आहे तुला जर आवडेल तर आपण एकत्र येऊ. ईच्छा नसेल तर तुझी मुलगी तुला देऊन मी निघून जाईल.
शर्मिला… शशांक किती लाजवशील मला मी एकदा खूप मोठी चुक केली .तुला ओळखु शकले नाही .आज मात्र अशी चुक करणार नाही अन महत्वाचे म्हणजे एका लेकीला तिच्या लाडक्या बाबापासून दूर करायचे पाप कधीच करणार नाही.
त्या दोघांचे एकमेकांबद्दल चे अबोल प्रेम पाहून प्रितीला गहीवरुन आले आणि तिने धावत जाऊन दोघांचा हात एकमेकाच्या हातात देऊन त्यांना घट्ट मिठी मारली.
शेवटी पवित्र प्रेमाची ताकद मोठी ठरली अन गोष्ट दुसऱ्या लग्नाची सफल झाली.

विनया देशमुख

error: Content is protected !!