“अन्नपूर्णेचा नवा प्रवास”

#माझ्यातली मी
#विकेंडटास्क (23/1/2026)
#जाहिरात लेखन
“​अन्नपूर्णेचा नवा प्रवास”
​माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा! तिच्या हाताला अशी काही चव आहे की साधं फोडणीचं वरण-भातही अमृतासारखा लागतो.

पण म्हणतात ना, ‘घर की मुर्गी दाल बराबर’… तसंच काहीसं आमच्या बाबतीत होतं.

आमच्या घरात आईच्या या सुग्रणपणाचं कधीच विशेष कौतुक झालं नाही. उलट, “आज हेच केलं का?” किंवा “त्यात मीठ कमी आहे,” “भाजीला चवच नाही,” अशा तक्रारींचाच पाढा नेहमी वाचला जायचा.

​असाच एकदा संक्रांतीचा सण आला आणि आईने उत्साहाने तिळगुळाची पोळी करायचं ठरवलं. “हे शास्त्र असतं,” असं ती म्हणाली. आम्ही घरातल्या सगळ्यांनी नेहमीप्रमाणे नाकं मुरडली.

“कशाला एवढा व्याप करतेस? बाहेरून विकत आणली असती, छान मिळतात,” माझ्या मैत्रीणीच्या आई कडून मागवते. छान असतात तिच्या! “असं म्हणून मी देखील तिला निरुत्साहित केलं.

आईने काही उत्तर दिलं नाही, पण मनात नक्कीच म्हणाली असेल की, घरच्या अन्नाची तुम्हाला किंमत नाही. मग तिने शांतपणे आपला पदर खोचला आणि कामाला लागली.आमची कोणाचीही मदत तिनं नाकारली.

तिने तिळगुळाचे लाडू केले, मऊशार गुळपोळ्या तयार केल्या. काम करताना ती हळूच म्हणाली, “लहानपणी घरीच हलवा देखील केला आहे मी. आवड होती मला. तुमचे हलव्याचे दागिने घालून काढलेले फोटो बघा अल्बममध्ये, तो हलवा आणि ते दागिने मीच केले होते बरं का!” तो आम्हाला टोमणाच होता.

​संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. मी सजावटीला थोडीफार मदत केली. पण मला फारसा रस नव्हता.

आलेल्या सुवासिनींना आईने प्रेमाने त्या पोळ्यांचा आस्वाद घ्यायला लावला, छान वाण आणि तिळाचे लाडू दिले. कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला.

​खरा चमत्कार झाला दुसऱ्या दिवशी! सकाळपासूनच आईचा फोन खणखणू लागला. काल आलेल्या एका काकूंचा फोन होता, त्या म्हणाल्या, “वहिनी, कालची गुळपोळी काय अप्रतिम होती! इतकी खुसखुशीत पोळी बाहेर कुठेच मिळत नाही. तुम्ही ऑर्डर घ्याल का? माझ्या मुलीच्या डोहाळजेवणाची ऑर्डर तुम्हालाच द्यायची आहे.”

आईचा चेहरा आनंदाने फुलला. तिने बाबांकडे पाहून विचारलं, “काय हरकत आहे? गुळपोळी तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. सुरुवात करेन मी गुळपोळीपासून…

बघूया जमलं तर पुरणपोळी, लाडू असं वाढवता येईल. वेळही जाईल, छंदही जोपासला जाईल आणि चार पैसेही कमावले जातील.”

​बाबांनी नेहमीप्रमाणे नकार दिला, “तुला जमणार नाही हे सगळं, कशाला आटापिटा करतेस?” पण आई आज ठाम होती. ती म्हणाली, “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! मला काहीतरी करायचं आहे. ‘आई कुठे काय करते, ती तर घरीच असते’ हे लेबल मला पुसायचं आहे.”

​सकाळच्या त्या पहिल्या कौतुकाच्या फोनने आईला आत्मविश्वास मिळाला. आईच्या आयुष्याला नवी दिशाच मिळाली म्हणाल तर!

मग काय थोडीफार आमची नाराजी सहन करून आईने जिद्दीने काम सुरू केलं.

सुरुवातीला फक्त गुळपोळ्यांच्या ऑर्डर्स होत्या, मग कोणाकडून तरी तिळगुळाच्या लाडवांची मागणी आली. बघता बघता आईच्या हाताची चव सगळीकडे पसरली.

मग ती गुळपोळीसोबत एक पुरणपोळी सॅम्पल म्हणून देऊ लागली. मग काय, सुग्रास पुरणपोळ्या, साजूक तुपातले बेसन लाडू आणि खुसखुशीत करंज्यांचीही मागणी वाढली.

​ज्या घरातून सुरुवातीला विरोध झाला होता, आज त्याच घरातले सगळे सदस्य आईच्या मदतीला धावून येऊ लागले.

मी स्वतः तिच्या पदार्थांची जाहिरात बनवून दिली.खरं सांगू आज बाबा या बिझनेसचा सगळा हिशोब सांभाळतात, तर दादा ऑर्डर्सची डिलिव्हरी करतो.

मला माझ्या मैत्रिणींकडून ऑर्डर्स येतात.आई आता फक्त एक ‘गृहिणी’ राहिली नव्हती, तर ती एक यशस्वी उद्योजिका झाली होती.

घराच्या एका कोपऱ्यातून सुरू झालेला हा छोटासा उद्योग आज शेकडो लोकांच्या जिभेवर तृप्तीचं हसू फुलवत आहे.

आईच्या कष्टाला आणि चवीला मिळालेला हा सन्मान पाहून आमची मान आज अभिमानाने उंचावली आहे.

​ खरच आईच्या हाताची ती जादू जी तुमच्या प्रत्येक जेवणातल्या पदार्थाला खास बनवते.”आई कुठे काय करते” या प्रश्नाचे उत्तर आता मिळालं आहे. ती आता आमच्यासाठी नाहीतर तुमच्यासाठी देखिल चविष्ट पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ बनवते.

उज्वलाज् ( URS) गृह उद्योग म्हणजे फक्त पदार्थ नाहीत तर ते आहे प्रेम,आपुलकी आणि पारंपरिक चवीचा अनुभव गृहिणी ते यशस्वी उद्योजिका, हा आमच्या आईचा प्रवास आहे आणि तिच्या हातून बनवलेल्या पदार्थाची चव हा त्याचा पुरावा आहे.

तिच्या हातची पुरणपोळी असो वा गुळपोळी बेसन लाडू असो वा खुसखुशीत करंजी किंवा शंकरपाळी प्रत्येक पदार्थाची चव अगदी घरगुती आई आज्जीच्या चवीची आठवण देते वेळोवेळी.

आमच्या ब्रँडचे नाव: उज्वलाज् (URS) गृह उद्योग
टॅगलाईन :आईच्या हाताची चव न्यारी, ती आता प्रत्येकाच्या घरी

error: Content is protected !!