खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल तरीही शब्द कधीही बदलत नाही.
वरील वाक्याचा उपयोग करून कथा लेखन (२४/१०/२५)
अनमोल भेट……
मी घरी आल्यावर सासूबाई म्हणाल्या की, अगं विजू, हे तुझे पार्सल आले आहे. बघ कोणाचे आहे? मी पार्सल वरचा fromचा पत्ता बघितला पण कोणी पाठवले ते लक्षात येईना, म्हणून पार्सल उघडले तर एक खूप जुने पुस्तक होते. मीच माझ्या मैत्रिणीला रंजनाला, वाढदिवसाला दिले होते. आत एक चिठ्ठी होती.
प्रिय, विजू,
तू मला दिलेले हे पुस्तक आठवतय का? मी जपून ठेवले होते. यातील सर्व कथा आपण एकत्र वाचल्या होत्या. शेवटची कथा हि मैत्रीवर होती. आपली मैत्री पण तशीच आहे. मी लग्न करून अमेरिकेला आले. त्यानंतर आपली एक दोनदाच प्रत्यक्ष भेट झाली. पण आपण फोनवर व नंतर व्हाट्सऍप वर चॅटिंग करत होतो. मला सहा महिन्यापूर्वीच समजले की, मला कॅन्सर आहे व माझ्या कडे आता फार दिवस नाहीत. मला तुझी खूप आठवण येते, तुला भेटावेसे पण वाटते, पण ते आता शक्य नाही, म्हणून हि आपल्या मैत्रींची आठवण तुला भेट म्हणून पाठवली आहे. आपली मैत्री खरी आहे. तूच मला पुढच्या जन्मी मैत्रीण म्हणून हवी आहेस, अशी प्रार्थना मी देवाला केली आहे. तू पण कर. परत नक्की भेटू पुढच्या जन्मी.
तूझीच मैत्रीण,
रंजू.
तिच्या आठवणीने डोळे भरून आले. तिच्या पहिल्या ते शेवटच्या भेटीचे चलचित्र डोळ्यासमोर येत होते. तिने दिलेली हि अनमोल भेट मी कायम जपून ठेवणार आहे. देवा माझ्या या मैत्रिणीला त्रास न होता मुक्ती दे हिच मनापासून प्रार्थना आहे.
शब्द संख्या : २३०
