अति तिथे माती

#अतितिथेमाती

बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता आणि शेफालीच्या मनात आठवणींचा पूर दाटला होता….. वीज गेली होती आणि मोबाईलचं चार्जिंग संपल्यामुळे तिला मुलींना फोनही करता येत नव्हता.

शेफाली एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. एक महिन्याभरापूर्वीच तिची मुंबईहून राजस्थानच्या सवाई माधोपूरमधे बदली झाली होती. शरद – तिचे यजमानही त्याच बॅंकेत होते. त्यांची नुकतीच सहाय्यक महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती झाली होती. बारा वर्षांची सई आणि सात वर्षांची जाई आपल्या शाळेत छान रमल्या होत्या. शिवाय त्यांची काळजी घ्यायला बायजाबाई होत्याच. बायजाबाईंच्या जिवावरच तर तिने एवढ्या लांब जायचं ठरवलं होतं.

शेफाली हुशार, तडफदार, प्रचंड महत्वाकांक्षी. तिने स्वतःला बॅंकेच्या कामात वाहूनच घेतलं होतं. तिचा जोम, तिची कार्यकुशलता, तिचं बॅंकिंगविषयीचं ज्ञान पाहून सगळेच कर्मचारी अचंबित होत. पण तिची ही समर्पित वृत्ती इतरांना फार जाचक होई.

सरिताचा मुलगा अमेरिकेला शिकायला गेला, तिथेच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. त्याने सरितेचं अमेरिकेचं तिकिट काढलं. म्हणून तिने सुट्टीसाठी अर्ज केला. त्यावर तिला एवढं मोठं भाषण ऐकावं लागलं!
“तुम्ही एवढ्या वरिष्ठ, अनुभवी असूनही एप्रिलमधे कशी एवढी सुट्टी टाकू शकता? तुम्हांला माहीत नाही का तेव्हा ऑडिट सुरू होतं ते? माझे सासू-सासरे दोघेही कोरोनाने आजारी होते, दवाखान्यात होते, ते गेले तरीही मी ऑडिट संपेपर्यंत सुट्टी घेतली नव्हती…..”
थोड्या फार फरकाने हे असेच अनुभव शाखेतल्या सगळ्यांना येत होते. आणि सगळ्यांच्याच मनात असंतोष धुमसत होता.

एकदा तर तिने कहरच केला. तिच्या धाकट्या मुलीला -जाईला- डेंग्यू झाला, तर ह्या पठ्ठीने फक्त दोन दिवस ती दवाखान्यात असेपर्यंतच सुट्टी घेतली. तिसऱ्या दिवशी लहानग्या सईवर तिची जबाबदारी टाकून ही बॅंकेत हजर! सगळ्यांनाच तिचं हे वागणं फारच खटकलं. सईची तर इतकी दया आली!

इतकं करूनही तिचं लक्ष्य काही पूर्ण झालं नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं तिने. दोघा अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा ‘नोटीस बदावली. शेवटी काही जणांनी तिच्या वरिष्ठांकडे तक्रार केली, तर काहींनी युनियनकडे धाव घेतली. आणि म्हणूनच तिची राजस्थानला बदली झाली.

मुंबईच्या शाखेत तिला ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ पुरत नव्हता. आणि इथे – या खेड्यात – वेळ सरता सरत नव्हता. दिवस तरी कसाबसा निघून जाई, पण कातरवेळ काळीज चिरत जाई….. मुलींची, नवऱ्याची आठवण अस्वस्थ करी. मुंबईत असताना ज्या मुलींकडे ती दुर्लक्ष करत होती, आज त्याच मुली तिने फोन केल्यावर अभ्यासात व्यस्त असल्याचं, मैत्रिणी वाट बघत असल्याचं, कारण सांगून आपल्याला टाळत आहेत असं तिला वाटू लागलं होतं.

आपल्या हट्टापायी, दुराग्रहापायी, महत्वाकांक्षेपायी आपण काय गमावलंय्, ते आता तिला समजत होतं. आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला, उपभोगायला नुसतं तत्वज्ञान पुरत नाही, व्यावहारिक ज्ञानही लागतं; नाहीतर हे असे चटके बसतात, हे आता तिला चांगलंच कळून चुकलं होतं.
-©️®️अनुपमा मांडके
०४/०८/२०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!